केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र, मुंबईसाठी विशेष तरतूद करा; संजय राऊतांची केंद्राकडे मागणी

shiv sena sanjay raut reaction congress leader balasaheb thorat and nana patole controversy

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होत असल्याने मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या वर्षात देशातील 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर एप्रिल- मे 2024 दरम्यान लोकसभा निवडणुका लागणार आहेत. यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. याच अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकारने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी आता खासदार संजय राऊत यांनी केंद्राकडे केली आहे. तसेच देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल मुंबईतून दिला जातो, त्यामुळे भरपाई होणं गरजेचं आहे म्हणत या अर्थसंकल्पामधून काही भरपाई दिली तर आम्ही केंद्र सरकारचे आभारी राहू. हा पैसा भाजपाचा नसून जनतेचा आहे. हे बजट भाजपाचे नसून जनतेचे आहे, असाही राऊत म्हणाले. राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलत होते.

नुसतं राजकारणासाठी येऊ नका, येताना मुंबईसाठी काहीतरी घेऊन या

मुंबईसाठीही केंद्राने वेगळी भूमिका घेणे गरजेचे आहे. खास करुन मुंबईसाठी. मुंबई महानगरापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदी वारंवार मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आणि महाराष्ट्राच्या आधीच्या महाविकास आघाडी सरकारने आणि महानगरपालिकेने केलेल्या कामांचीच उद्धाटन करतायत. साधारण महिन्याभरात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा मुंबईत येत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की मुंबई महानगरपालिका हे त्यांच लक्ष आहे. पण नुसतं राजकारणासाठी येऊ नका, येताना मुंबईसाठी काहीतरी घेऊन या. जेणेकरून महाराष्ट्र आणि मुंबईला वाटेल की, तुमची राज्य करण्याची भूमिका समतोल आहे, असही राऊत म्हणाले.

मुंबईतील अनेक प्रकल्प अर्धवट, त्या प्रकल्पांसाठी केंद्राची गरज

मुंबईने देशाला सातत्याने देण्याचा प्रयत्न केला. आज केंद्राच्या तिजोरीतील मोठा वाटा मुंबई आणि महाराष्ट्राकडून जातो. अनेक गरीब राज्यांचं पोट मुंबईमुळे भरलं जातं. अशावेळी मुंबईतील अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. त्या प्रकल्पांसाठी केंद्राची गरज आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात काही मागणी केली आहे. सरकारला रितसर पत्र व्यवहार केला आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान आणि अर्थमंत्री विचार करतील, असही राऊतांनी नमूद केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय देश लुटला जातोय. त्या लुटीच्या पैशामध्ये मुंबईचाही पैसा आहे. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल मुंबईतून दिला जातो, त्यामुळे भरपाई होणं गरजेचं आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. लाखोंचे रोजगार देणारे उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले. या अर्थसंकल्पामधून काही भरपाई दिली तर आम्ही केंद्र सरकारचे आभारी राहू. हा पैसा भाजपाचा नसून जनतेचा आहे. हे बजट भाजपाचे नसून जनतेचे आहे, असेही राऊत म्हणाले.


union budget 2023 : कोरोनानंतरही देशाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती; अर्थसंकल्पापूर्वी भागवत कराडांकडून मोदींचं कौतुक