नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत आपल्या पक्षा 350 गुंडांना प्रवेश दिला आहे असा दावा करत, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शाहू महाराज छत्रपती यांना पाठवण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे आणि हा चांगला प्रस्ताव आहे, असे मत संजय राऊत मांडले.
संजय राऊत म्हणाले, “सध्या राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भात चाय पे चर्चा करत फिरत आहेत. फडणवीसांनी ती चर्चा करण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रातील गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी. राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे हे रोज त्यांच्या पक्षात गुंडांना प्रवेश देत आहेत. याबाबतचे फोटो मी रोज ट्वीट करत लोकांसमोर आणत आहेत. आजही फोटो टाकला आहे.”
शिंदे गँग च्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा..
ठाणे पुणे परिसरात हत्या,अपहरण,सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे..अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत!
पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महातम्याची माहिती जाहीर करावी!… pic.twitter.com/bHZnasDtQY— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2024
महाराष्ट्रात गुंडांच राज्य सुरू
शिंदे गटात गुंडांना प्रवेश दिला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “हत्या, दरोडेखोर, लुटमार करणारा ठाणे-पुण्यातील एक महत्त्वाचा आरोपी जामिनावर सुटला आहे. त्या आरोपीला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे. आत्तापर्यंत 350 गुंडांना पक्षात प्रवेश दिला आहे आणि तेवढेच गुंड हे पदासाठी वेटिंगवर आहेत. महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे, ते गुंडांचे राज्य, हे कोणाला राज्यसभेवर पाठवणार आहेत? एखाद्या गुंडाला पाठवणार आहेत का? फडणवीसांनी त्यावर भाष्य केले पाहिजे”, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा – PM Modi : “डॉ. मनमोहन सिंग हे मतदानासाठी आले नाहीत पण…”, पंतप्रधान मोदींकडून कौतुक
शिंदे एकही सदस्य राज्यसभेवर पाठवू शकत नाही
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रस्ताव आला आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. संजय राऊत म्हणाले, “राज्यसभेची निवडणूक आहे. भाजपाकडून कोणाला पाठवायचे हा त्यांचा प्रश्न आहे. पण शिंदे गँग हा त्यांचा माणूस राज्यसभेवर पाठवू शकत नाही. कारण त्यांच्या दिल्ली हायकमांडने मिलिंद देवरा यांना त्यांच्यावर लादले आहेत. यामुळे त्यांच्याकडील लोक हे वेटिंगला होते, आता त्या सर्वांमध्ये निराशा पसरली आहेत. काँग्रेस राज्यसभेवर एक उमेदवार पाठवू शकते. आमच्याकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि इतर लहान पक्ष मिळून आमच्याकडे 32 मते आहेत आणि हा आकडा लहान नाही. आम्हाला 7 ते 8 मतांची गरज आहे”, असे संजय राऊत यांनी सांगितले.