“आमचा विरोध संसद भवनला नाही तर…” संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण

आमचा विरोध नव्या संसद भवनाला नाही तर त्या कार्यक्रमातून देशाच्या राष्ट्रपतींना डावलण्यात आल्याने त्या गोष्टीला विरोध असल्याचे सांगण्यात आले आहे. पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली.

Sanjay Raut explained the matter of opposing the program of the new parliament building

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले जाणार आहे. सेंट्रल व्हिस्टा या नावाने हा प्रकल्प ओळखला जातो. मात्र, या कार्यक्रमाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित न केल्याने देशातील विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी केली आहे. तर 19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. मात्र, याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमचा विरोध नव्या संसद भवनाला नाही तर त्या कार्यक्रमातून देशाच्या राष्ट्रपतींना डावलण्यात आल्याने त्या गोष्टीला विरोध असल्याचे सांगण्यात आले आहे. पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली. (Sanjay Raut explained the matter of opposing the program of the new parliament building)

हेही वाचा – ‘बच्चू कडू मजबूर झालेत, त्यांची अशी अवस्था…’; राष्ट्रवादीचा टोला

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडत सांगितले की, आम्ही विरोधी पक्ष नसून देशभक्त आहोत. आम्ही लोकशाहीवादी आहोत. देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत. आमचा नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोध नाही. पण त्या उद्घाटन सोहळ्यामध्ये देशाच्या राष्ट्रपतींना सामावून घेतलं पाहिजे. कारण एक आदिवासी महिला जी राष्ट्रपती पदावर बसलेली आहे. तो त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रपती आणि संसद मिळून लोकशाही आणि पुढील प्रक्रिया सुरू होतात. पण आपण फक्त एक पॉलिटीकल इव्हेंट, राजकीय उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधानांनी याचे उद्घाटन करावे, असे भाजपने ठरवले असेल तर चुकीचे आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

आमचा मुद्दा हा संविधानीक आणि नैतिक आहे, असे म्हणत संजय राऊत म्हणाले की, नवीन संसद भवन उभारले, याचा आनंद आहे. पण यानिमित्ताने देशाच्या घटनेवर पुन्हा एकदा हल्ला होत आहे. याला आमचा विरोध आहे, असे स्पष्टीकरण राऊत यांनी यावेळी दिले. पंतप्रधान मोदी आताच तीन देशाच्या दौऱ्यावरून परत आले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, असा सल्ला संजय राऊत यांच्याकडून देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करावं आणि या वादावर पडदा टाकावा. अशी भूमिका असल्याचे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे जर का मोदींनी राष्ट्रपती मुर्मू यांना जाऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले तर विरोधक या कार्यक्रमाला जाणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.