घरमहाराष्ट्रनारायण राणेंविरोधात संजय राऊतांचा अब्रुनुकसानीचा दावा

नारायण राणेंविरोधात संजय राऊतांचा अब्रुनुकसानीचा दावा

Subscribe

 

मुंबईः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुलुंड कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी राऊत यांनी फ्रेब्रुवारी महिन्यात राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्याचे उत्तर न मिळाल्याने राऊत यांनी हा दावा दाखल केला आहे.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांना खासदार बनवले आणि त्यासाठी मी पैसा खर्च केला, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी भांडूप येथील एका कार्यक्रमात केला होता. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठविली होती. हा दावा पुराव्यानीशी सिद्ध करावा, अशी नोटीस राऊत यांनी राणे यांना बजावली होती. राणे यांनी त्याचे उत्तर न दिल्याने राऊत यांनी मुलुंड कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 2004 मध्ये आपल्याला संजय राऊत यांना खासदार बनविण्यास सांगितले होते. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यालाच खासदार बनवायचे होते. पण बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी संजय राऊत यांचा अर्ज भरून घेतला होता. निवडणुकीच्या यादीत त्यांचे नाव देखील नव्हते, असे नारायण राणे यांनी सांगितले.

- Advertisement -

काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांनी संजय राऊत यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. पण संजय राऊत हा माझा माणूस असल्याचे सांगत मी विनंती केल्यावर रोहिदास पाटील यांनी पुढे आक्षेप घेतला नाही, असे सांगून नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत यांना खासदार बनविण्यासाठी किती पैसा खर्च केला ते आता सांगणार नाही.

संजय राऊत यांनी नारायण राणे याचा हा दावा फेटाळत मला खासदार शिवसेना प्रमुखांनी केले, असे सांगितले. त्यांनी याप्रकरणी राणेंना नोटीस पाठविली आहे. यादीत माझे नाव नव्हते, हे नारायण राणे यांनी सिद्ध करून दाखवावे. तसेच, पैसे खर्च केले म्हणजे नेमके काय केले होते? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. असे पैसे खर्च करणे म्हणजे लाचलुचपतप्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे प्रकरण येते, याकडेही संजय राऊत यांनी लक्ष वेधले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -