गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊत प्रथमच नाशकात; काय भूमिका घेणार?

गुन्हा दाखल झाल्यावर संजय राऊत नाशकात; काय भूमिका घेणार?

नाशिक : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात रविवारी (दि. १९) रात्री उशिरा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राऊत यांनी पत्रकार परिषदे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या बाबत त्यांच्या विरोधात संविधान पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाने गुन्हा दाखल केला होता. यानंतर शिंदे गटाच्या युवा सेनेने त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत नाशिक जिल्ह्यात आल्यास त्यांनाही जोडे मारू असा इशारा दिला होता. आता, याच पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत मंगळवारी (दि.२१) सायंकाळी नाशिक शहरात दाखल होत आहेत. नेमकं त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा व युवासेनेचे दिलेल्या आव्हानावर ते काय भूमिका घेतात हे बघणे महत्वाचे आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालावर केंद्रिय मंत्री अमित शहा यांनीही प्रतिक्रिया देत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सुनावले. पुणे दौऱ्यात शहा यांनी ठाकरे हे काँग्रेस व राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले, असा आरोप केला. यावर उत्तर देताना राऊत यांची जीभ घसरली. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला ज्ञान देत असल्याचे विधान राऊत यांनी केले होते. यानंतर नाशकात शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला होता. त्यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते. तसेच यावेळी शिंदे गटाच्या युवा सैनिकांनी संजय राऊत यांनी नाशिक जिल्ह्यात पाय ठेऊन दाखवावा. आम्ही त्यांना जोडे मारल्या शिवाय गप्प बसणार नाही असे आव्हान दिले होते.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत मंगळवारी (दि. २१) सायंकाळी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. राऊत यांचा हा दौरा नेमका कोणत्या करणासाठी आहे हे जरी अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शिंदे गटाने दिलेल्या आव्हानानंतर राऊत त्यावर काय भूमिका घेणार? या प्रश्नामुळे या दौऱ्याचे महत्व अधिक वाढले आहे. मागील काही वर्षात राऊत यांच नाशिकला येणे नित्याचेच झाले आहे. प्रथमच त्यांना थेट आव्हान निर्माण झाल्यामुळे संघर्ष उपस्थित होतो का हे बघणेही महत्वाचे ठरणार आहे.