नो एन्ट्रीच्या इशाऱ्यानंतरही संजय राऊत पुण्यात; सेना-भाजपमध्ये होणार राडा?

Sanjay Raut

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजपने राऊत यांना पुण्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा दिला होता. मात्र, राऊत पुण्यातील वडगाव शेरीत मेळावा घेत भाजपला आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा राडा होणार की काय? अशा चर्चा सुरु आहेत.

संजय राऊत यांच्या कोथळा काढण्याच्या वक्तव्यावरुन त्यांना पुण्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता. मात्र, संजय राऊत हे मुळीक यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात जाऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात राऊत काय बोलणार याकडे साऱ्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, संजय राऊत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळमधील पक्षाच्या वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांचा दौरा आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या महाविकास आघाडीत किती सदस्यांचा प्रभाग असला पाहिजे याविषयी मतभेद आहेत. त्यामुळे राऊत यावर काय भाष्य करणार हे महत्त्वाचं असणार आहे.

अडवून दाखवा; शिवसेना स्टाईलने भाजपचं स्वागत करु

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत पुण्यात त्यांना फिरकू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला होता. यावर शिवसेनेने देखील भाजपला आव्हान दिलं आहे. संजय राऊत पुण्यात येणार असून त्यांना अडवल्यास शिवसेना स्टाईलने भाजपचं स्वागत करु, असा इशारा शहर शिवसेनेच्यावतिने देण्यात आला आहे.


हेही वाचा –  ‘संजय राऊत पुण्यात येणार, अडवून दाखवा; शिवसेना स्टाईलने भाजपचं स्वागत करु’