मुंबई : विलेपार्ले येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते, मंत्री चंद्रकांत पाटील समोरासमोर आले. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण ठाकरे आणि पाटलांची ही भेट काही पहिल्यांदाच झालेली नाही. याआधी विधानभवनातही दोनदा उद्धव ठाकरे हे चंद्रकांत पाटलांना भेटले आहेत. त्यामुळे या बुधवारी (ता. 29 जानेवारी) झालेल्या भेटीनंतर ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे आमचे चांगले नेते आहेत, त्यांनी युतीविषयी व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो, असे म्हटल्याने चंद्रकांत पाटलांशी ठाकरे गटाची जवळीक हे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत तर नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर खासदार राऊतांनी केलेल्या विधानामुळे तर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Sanjay Raut indicative statement on Yuti after meeting Uddhav Thackeray and Chandrakant Patil)
हेही वाचा… Supriya Sule : फरार कृष्णा आंधळे 51 दिवसांपासून आहे कुठे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 30 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत विचारणा करण्यात आली. ज्याबाबत संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील आमचे चांगले मित्र आहेत. ते युतीचे समर्थक आहेत. शिवसेना-भाजपा युतीसंदर्भात विचार करणारी जी जुनी पिढी होती, त्यात चंद्रकांत पाटील आहेत. परंतु भाजपामध्ये नवीन बाहेरुन आलेले हवश्या-नवश्या लोकांना शिवसेना-भाजपा युतीचे महत्व माहीत नाही. आम्ही एकत्र 25 वर्ष चांगले काम केले. नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले काम झाले. पण दिल्लीत अमित शहा आले आणि शिवसेना-भाजपा युती तुटली. भाजपातील काही लोकांच्या हट्टामुळे सुद्धा युती तुटली, असे म्हणत राऊतांनी युती तुटण्यासाठी भाजपातील काही नेत्यांना आणि केंद्रीय मंत्री शहांना जबाबदार धरले आहे.
तसेच, चंद्रकात पाटील यांनी युतीबाबत ज्या भावना व्यक्त केल्या, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे म्हणत राऊतांनी सांगितले की, भाजपामधील अनेक नेत्यांच्या मनात युतीबाबत ज्या भावना आहेत, त्या ठाकरे गटातील नेत्यांच्या मनातही असून शकतात. आम्ही महाविकास आघाडीसोबत गेलो, यासाठी भाजपातील काही नेत्यांचा हट्ट जबाबदार आहे. 25 वर्षांची युती ज्या कारणासाठी तुटली ती कारणे पाहिली तर तेव्हा आमची भूमिका योग्य होती. कारण जे आम्ही मागत होतो, जो आमचा हक्क होता, तो हक्क पक्ष फोडल्यानंतर शिंदे गटाला देण्यात आला. आम्ही जो मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता, आमचा तो हक्क एकनाथ शिंदेंना देण्यात आला. पण जेव्हा आम्ही चर्चेत ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रिपद मागितले, तेव्हा ते अमित शहांनी नाकारले. तेव्हा अमित शहांनी ठरवून हे केले, कारण शहांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होता, असा आरोपही यावेळी संजय राऊतांनी केला.
आम्ही Wait And Watch च्या भूमिकेत…
मी याक्षणी युतीबाबत उत्तर देऊ शकत नाही. पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही सध्या Wait and Watch या भूमिकेत आहोत. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपासोबत किती काळ राहील आणि किती वेळ टिकवला जाईल याबाबत माझ्या मनात साशंकता आहे. एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेप्रमाणे फोडला जाईल. त्यांचा गट विस्कळीत होईल. आज केवळ सत्ता आणि पैसा या जोरावर ते एकत्र आहेत बाकी त्यांच्याकडे काही नाही, असा दावा यावेळी राऊतांनी केला आहे.