Homeमहाराष्ट्रSanjay Raut : मविआतील जागा वाटपाचा तिढा सुटला? राऊतांची महत्त्वाची माहिती

Sanjay Raut : मविआतील जागा वाटपाचा तिढा सुटला? राऊतांची महत्त्वाची माहिती

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. परंतु, अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. याचसाठी मुंबई दौऱ्यावर असलेल्या जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत महायुतीतील जागा वाटपाबाबत चर्चा केली आहे. तर महाविकास आघाडीतही जागा वाटपावरून कोणतेच मतभेद नसल्याची माहिती माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. (Sanjay Raut informed that there is no difference in seat allocation in Mahavikas Aghadi)

हेही वाचा… Maharashtra Politics : संजय राऊतांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

आज (ता. 22 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमचे जागावाटप हे अत्यंत काळजीपूर्वक आणि सुनियोजित पद्धतीने सुरू आहे. 27 तारखेला आम्ही भेटणार आहोत. दुपारनंतर प्रमुख पक्ष, नेते एकत्र येऊन जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. तर, जागा वाटपासाठी महाविकास आघाडीचा असा काही फॉर्म्युला नाही. पण ज्याची जिथे जास्त ताकद आहे, तिथे तो पक्ष लढणार आहे, असे राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजपा 32 जागा लढवणार आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या गँगविषयी मी काहीही बोलणार नाही. भाजपा अनेक गँग तयार करून निवडणूक लढत आहे. टोळी युद्धात आम्हाला पडायच नाही. पण ज्यावेळी शिवसेना अखंड होती, तेव्हा शिवसेना-भाजपासोबत स्वाभिमानाने 23 जागांवर लढली. या वेळी सुद्धा 23 जागांवर लढू. आमची खरी शिवसेना आहे, लाचार नाही, फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. तर काल गजानन कीर्तिकर भाजपाबाबत जे काही बोलले, ते त्यांनाच जाऊन विचारा, असेही राऊतांकडून सांगण्यात आले आहे. तसेच, 27 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार एकत्र येऊन जागा वाटपाबद्दल माहिती देतील, अशी महत्त्वाची माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे.

यावेळी त्यांनी काल जे. पी. नड्डा यांनी 370 जागा जिंकण्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून लबाडी करण्यात येते हे चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी भाजपा 370 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. याचा अर्थ हा आकडा गाठण्यासाठी यांनी (भाजपाने) आधीच यंत्रणा ताब्यात घेतलेल्या आहेत. ही लोकशाहीची थट्टा आहे, अशा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.