संजय राऊत म्हणजे शिवसेनेतील सडका कांदा !

खासदार हेमंत गोडसे यांचा घणाघात ; सेनेने राऊतांना आवर घालणे गरजेचे

Hemant Godse
हेमंत गो़डसे

सकाळी उठायचं, टीव्ही समोर येऊन बडबड करायची इतकचं काय ते काम खासदार संजय राऊत यांनी केले. राऊतांमुळेे राज्यातील जनमाणसांत पक्षाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे एखाद्या टोपलीतील सडका कांदा बाजूला ठेवावा त्याचप्रमाणे राऊत यांना आवर घालणे गरजेचे असल्याचा घणाघाती आरोप खासदार गोडसे यांनी केला. नाशिक येथे आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

शिवसेनेच्या खासदार शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या खासदारांमध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचाही सहभाग आहे. दिल्लीतील या राजकीय घडामोडींनंतर शुक्रवारी खासदार गोडसे यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी उपनगर येथील इच्छामणी लॉन्समध्ये झालेल्या मेळाव्याप्रसंगी खासदार गोडसे यांनी खासदार राऊतांवर घणाघात करतांना महाविकास आघाडीवरही टिकास्त्र सोडले. गोडसे म्हणाले, आम्ही सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू शिंदे गटात सहभागी होण्यापूर्वीही आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत चर्चा केली. यावेळी आम्ही दोनच मागण्या मांडल्या यामध्ये भाजपसोबत आपली नैसर्गिक युती व्हावी याकरीता शिंदेंना पुन्हा बोलवून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात यावा आणि संजय राऊत यांना आवर घाला या आमच्या मागण्या होत्या.

भाजपसोबतच्या २५ वर्ष युतीच्या कार्यकाळापेक्षा मागील अडीच वर्षांचा अनुभव अतिशय खराब होता असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. राऊतांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याचेही ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. राऊतांना पक्षाने भरभरून दिले पण राऊत कधी रोजगाराच्या प्रश्नावर बोलले? कधी महागाईच्या मुददयावर त्यांनी आवाज उठवला? पूर परिस्थितीत त्यांनी कधी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली ? सकाळी उठायचं टीव्हीवर येऊन बोलायचं बस्स एवढंच. त्यामुळे टोपलीतील सडका कांदा बाहेर काढून ठेवतो तसंच राऊतांनाही आता आवर घालावा हे वारंवार आम्ही उध्दव ठाकरेंना सांगितले.

युतीसोबत जाण्याबाबत उध्दव ठाकरेही तयार होते परंतू यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आम्हाला हे पाउलं उचलावं लागण्याचे खा.गोडसेंनी सांगितले. २०२४ च्या निवडणूकीत काय व्हायचं ते होईल पण पुढील अडीच वर्षात नाशिकचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. गोडसे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी आपण उचलेलं पाऊलं योग्य आहे का, असा सवाल उपस्थितांना केला. तेव्हा उपस्थितांनीही गोडसेंना दाद देत एकप्रकारे त्यांच्या निर्णयाला सहमती दर्शवली.