राष्ट्रीय राजकारण आणि उद्धव ठाकरेंबाबत संजय राऊतांनी केले मोठे विधान…

भाजपविरोधात लढण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा विरोधी पक्षनेत्यांच्या सतत संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाच आता संजय राऊत यांच्याकडून राष्ट्रीय राजकारणात उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Sanjay Raut made a big statement about national politics and Uddhav Thackeray

भाजपविरोधात लढण्यासाठी इतर विरोधी पक्षांप्रमाणे ठाकरे गटाने देखील पुढाकार घेतला आहे. यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षातील नेत्यांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. तसेच उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा देखील करण्यात येत आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रीय राजकारणात उद्धवड ठाकरे यांनी यावे, अशी इच्छा आम्ही व्यक्त केली आहे. त्याबाबतचा निर्णय ते लवकरच घेतील, अशी माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, ”शिवसेना हा प्रादेशिक पक्ष म्हणून जरी माहित असला तरी,देशाच्या राजकारणात शिवसेनेची नेहमीच एक भूमिका राहिली आहे. राष्ट्रीय राजकारणातील अनेक प्रश्नांना शिवसेनेकडून सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर त्याची राष्ट्रीय राजकारणात चर्चा करण्यात आली. केंद्रीय यंत्रणांच्या साहाय्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडण्यात आले असले तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण देशाला विश्वास निर्माण झाला आहे.”

विरोधी पक्षात नेतृत्व करण्याच्या भूमिकेबाबत संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हे एक उत्तम चेहरा आहेत. परंतु, ते २०२४ मध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा असतील की नाही, याबाबतचे भाकीत आता लगेच करणं कठीण आहे. अनेकांना वाटतं त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे नेतृत्व करावे. मात्र सध्या विरोधी पक्षांना एकत्र येणे गरजेचे आहे. याचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि चंद्रशेखर राव यांच्यासारखे नेते करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाचा नेता कोण? हे नंतर ठरवले जाईल. मात्र उद्धव ठाकरे हे देखील एक विरोधी चेहरा राहू शकतात, असे सूचक विधान राऊतांनी यावेळी केली.

हेही वाचा – संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर, नितीन सरदेसाईंचा सरकारला इशारा

दरम्यान, २०२४ ची निवडणूक सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन का लढू नये? असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला. सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तरच पुढील लढाई लढणे सोपे होईल, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. तसेच राष्ट्रीय राजकारणात जे जे शक्य असेल ते सर्व उद्धव ठाकरे करतील. २०२४ च्या निवडणुकीत आमची खरी शिवसेना खासदारकीच्या निवडणुकीत अधिक जागांनी विजय मिळवेल, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.