खासदार संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, संजय पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

Sanjay Raut

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी (rajyasabha election) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje Chhatrapati)  यांना शिवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आता कमी झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut )यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा करत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती यांच्या जागी सहाव्या जागेवर संजय पवारांना (Sanjay Pawar ) संधी मिळण्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

आम्ही ही मतं अपक्ष उमेदवाराला कशी देणार?

राज्यसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी शिवसेनेकडे पुरेशी मतं आहेत. त्यामुळे संजय राऊत आणि संजय पवार लवकरच राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरू, अर्ज भरताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित असतील, असं संजय राऊत म्हणाले. आम्ही संभाजीराजे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यास तयार होतो. सहाव्या जागेसाठी लागणारी ४२ मतं आमच्याकडे होती. पण आम्ही ही मतं अपक्ष उमेदवाराला कशी देणार, असा सवाल देखील संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

संजय राऊतांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. आम्ही शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा संभाजीराजे छत्रपतींना द्यायला तयार झालो. छत्रपती घराण्याचा याहून अधिक कोणता सन्मान शिवसेनेने करायला पाहिजे होता, हे आता सांगावे, असं राऊत म्हणाले.

छत्रपतींना राजकीय पक्षाचे वावडे असण्याचे कारण नाही

छत्रपतींना राजकीय पक्षाचे वावडे असण्याचे कारण नाही. कारण मालोजीराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. तर संभाजीराजे स्वत: राष्ट्रावादीकडून लढले होते आणि पराभूतही झाले होते. त्यामुळे छत्रपती घराण्यातील व्यक्ती राजकीय पक्षात जात नाहीत, हा दावा चुकीचा आहे, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजे आता मराठा संघटनांशी चर्चा करून पुढील रणनीती निश्चित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं हीच अपेक्षा, संजय राऊतांची प्रतिक्रिया