चिन्ह आणि पक्षासाठी दोन हजार कोटींचा सौदा, निवडणूक आयोगावर राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut on Election Commission | निवडणूक आयोगाने दिलेला हा न्याय नाहीय. हा सौदा आहे, डील आहे. पुढचं मी भविष्यात सांगेन. हा निर्णय विकत घेतलेला निर्णय आहे. आमदार-खासदार विकत घेतले आहेत. नगरसेवकांचे भाव शहरानुसार ठरवले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

sanjay-raut-reaction-on-today-supreme-court

Sanjay Raut on Election Commission | मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. यावरून शिंदे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले तर ठाकरे गटाने पुन्हा एकदा जिद्दीने उभे राहणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा न्याय नसून सौदा आहे. आणि तब्बल २ हजार कोटींचा सौदा झाला असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी आज ट्वीट करत हा आरोप केला. त्यानंतर मुंबईत पत्रकारांशी संवाद साधतानाही त्यांनी याबाबत पुनरुच्चार केला.

संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “माझी खात्रीची माहिती आहे…. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत… हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील.. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते..”

हेही वाचा – निवडणूक आयोगाचा निकाल आधीच होता तयार; पोटनिवडणुकीचा उल्लेख कसा

असं म्हणतानाच त्यांनी एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ओळीही पोस्ट केल्या आहेत. “ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..! , असं म्हणत राऊतांनी केंद्रीय निवडणूक आयोगासह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.


तसंच, आज प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादातही त्यांनी हा सौदा झाल्याचा पुनरूच्चार केला. “मी अत्यंत खात्रीने बोलतोय. तुम्ही म्हणाल की काय पुरावे आहेत? तर पुरावे लवकरच येतील. जो पक्ष नेता, शाखाप्रमुख आणि नगरसेवकांना विकत घेण्याकरता ५० लाख देऊ शकतो. आमदारांना विकत घेण्याकरता ५० कोटी देऊ शकतो, तो पक्ष निवडणूक आोगाला किती पैसे देऊ शकेल? निवडणूक आयोगाने दिलेला हा न्याय नाहीय. हा सौदा आहे, डील आहे. पुढचं मी भविष्यात सांगेन. हा निर्णय विकत घेतलेला निर्णय आहे. आमदार-खासदार विकत घेतले आहेत. नगरसेवकांचे भाव शहरानुसार ठरवले आहेत. त्यामुळे हा सौदा १०० टक्के सत्य आहे हे सांगू शकतो. हा निकाल विकत घेतलेला आहे. यापुढे अशा अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकदिवस महाराष्ट्र आणि मुंबईसुद्धा विकत घेतील, असा घणाघात राऊतांनी केला.