मुंबई : हळूहळू बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून गाळल्या जातील. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला. संजय राऊतांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घट झाल्याचे सांगण्यात आले. त्यावरुन त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. आता सरकारकडे पैसे नाही. त्यामुळे त्यांना जेवढं ओझं कमी करता येईल, तेवढं ते करतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut On Ladki Bahin Yojana Slams Eknath Shinde)
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“हळूहळू बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून गाळल्या जातील. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. निवडणुका संपलेल्या आहेत. बहिणींनी मतं दिलेली आहेत. दर महिन्याचे १५०० रुपये असे तीन महिने त्यांना पैसे पोहोचले आहेत. आता पैसे नाही. त्यामुळे त्यांना जेवढं ओझं कमी करता येईल, तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांकडून या योजनेवर कठोर भाष्य करण्यात आले आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, महायुती सरकारला यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसे मिळाले. आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार आहेत. मात्र त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये वारंवार बदल केले जात आहेत. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यात 5 लाखांनी घट झाल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचे निकष वारंवार बदलले जात आहेत. त्यातच आता ज्या महिलांकडे किंवा ज्यांच्या घरात चारचाकी वाहन असेल त्यांचे अर्ज थेट बाद होणार असून त्यांचे नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे. या पडताळणीत जर लाभार्थी महिला एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात राहत असतील आणि पती अथवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी असेल, तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. जर त्या महिलेच्या नावावर चारचाकी असल्याचे निष्पन्न झाले तर तिचा लाडकी बहीण योजनेचा लाभ रद्द केला जाणार आहे. यामुळे महिलांची धाकधूक वाढली आहे.
हेही वाचा – RBI Monetary Policy : सर्वसामान्यांना आणखी एक दिलासा, रेपो दरात 0.25 टक्क्याची कपात