Republic Day 2025 मुंबई : दरवर्षी भारतात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यंदा देशभरात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राजकीय कार्यक्रमांपासून ते विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित केले जातात. पण यंदा महाराष्ट्रात काही विशेष कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे हे कार्यक्रम राजकीय असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईसह राज्यभरात संविधान आणि भारतमातेच्या संरक्षणासाठी पूजन व मिरवणूक काढण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. (Sanjay Raut On republic day of india uddhav thackeray shiv sena Constitution and Bharat Mata Puja procession)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची आज (24 जानेवारी) शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संविधान आणि भारतमातेच्या संरक्षणासाठी पूजन व मिरवणूकीच्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. त्यानुसार, “मुंबईत ही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम होणार आहे. शिवसेना भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारताच्या प्रजासत्ताक दिनाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, पण या देशाचे संविधान आणि भारतमाता धोक्यात असल्याचा संदेश लोकांपर्यंत जावा यासाठी ही मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच, आम्ही संविधान आणि भारतमातेचे रक्षणकर्ते आहोत हा संदेश ही दिला जाणार आहे”, असे संजय राऊत यांनी सांगितले.
याशिवाय, “जिल्हाप्रमुखांची आज (24 जानेवारी) शिवसेना भवन येथे बैठक झाली. अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 तारखेला संध्याकाळी 8 वाजता तालुका पातळीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये संकटात असलेल्या संविधान आणि भारतमातेचं मिरवणूक काढण्यात येणार आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सूचना दिल्या आहेत”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणजे असंख्य भारतीयांसाठी आणखी एक अभिमानाचा दिवस. हा तोच दिवस जेव्हा भारत देश जगभरात प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाला. देशभरात 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर लष्कराच्या भव्य पथसंचलनाचं आयोजनही करण्यात येतं. जिथं भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांचा उत्फूर्त सहभाग पाहायला मिळतो.