नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या पालकमंत्रिपदावरून मोठा वाद महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे. अशामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी, “महाराष्ट्रातून कोण जास्त थैल्या देतो, त्यावर त्या नेत्याचे वजन दिल्लीत ठरते. एकनाथ शिंदे यांचे ज्या अर्थी ऐकावे त्या अर्थी त्यावरून हे सिद्ध होते. कधी नव्हे तर इतक्या थैल्यांचा वापर महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारणात झाला आहे.” असा आरोप त्यांनी केला. तसेच शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनीदेखील 23 जानेवारीला शिवसेना ठाकरे गटातील आमदार शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याचे विधान केले होते, यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. (Sanjay Raut on Shivsena and Maharashtra Politics)
हेही वाचा : BEED : ती मानसिकताच मोडून काढली पाहिजे; बीड HIV घटनेप्रकरणी सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊत यांना नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळेल का? असे विचारले असता ते म्हणाले की, “महाराष्ट्रामधून कोण जास्त पैशांच्या थैल्या दिल्लीला देतो, त्यावर सबंधित नेत्यांचे दिल्लीत वजन असते. ज्या अर्थी एकनाथ शिंदे यांचे ऐकले जात आहे, त्याअर्थी आम्ही जे ऐकले ते खरे आहे. झारखंडच्या निवडणुकीपासून अनेक निवडणुकांचा खर्च महाराष्ट्रातील या नेत्यांनी केला. त्यामुळे त्याची किंमत असेल तर ती एकनाथ शिंदेंना मिळत असेल,” असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, ” पालकमंत्री स्थगितीच्या निर्णयात शिंदेचे किती महत्त्व आहे हे मला माहिती नाही. पण यामध्ये केंद्राने हस्तक्षेप केला असेल. मुख्यमंत्री निर्णय घेण्याचा आणि सरकारमधील गुंडागर्दी मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दिल्ली पालकमंत्रिपदासाठी रस्त्यावर येऊन दंगल करणाऱ्यांच्या बाजूने उभी आहे. महाराष्ट्रात याआधी असे झाले नव्हते.” असेही ते म्हणाले.
23 जानेवारीला ठाकरे गटात मोठा भूकंप होणार? राऊत म्हणाले
शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याचे विधान केले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “राहुल शेवाळेंचा आम्ही दारूण पराभव केला. आता ते किती फोडाफोडी करणार? अमित शाह आहेत तोपर्यंत शिंदे गटाचे अस्तित्व आहे. त्यानंतर या लोकांचे भविष्य काहीच नाही. अमित शाह आहेत, म्हणून निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय तुम्हाला हवा तसा निकाल देतात. बाकी तुमच्याकडे काय आहे?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.