मुंबई : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात बुधवारी (ता. 29 जानेवारी) चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत 30 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याबाबत आता विरोधकांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कुंभमेळ्यात झालेल्या मृत्यूंप्रकरणी आता कोणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. तर यावेळी त्यांनी महाकुंभमेळ्यात 8 ते 9 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचाही आरोप केला आहे. (Sanjay Raut question that who will file case of culpable homicide against in Kumbhmela Stampede)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 30 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत म्हटले की, प्रयागराजमधील चेंगराचेंगरीत 100 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शेकडो जण गंभीर जखमी आहेत. अनेक महिला, अबाल, वृद्ध, बेपत्ता आहे. एक प्रकारे तिथे अराजकता पसरली आहे. यामुळे महाकुंभचा संपूर्ण परिसर आर्मीच्या ताब्यात द्यावा. त्यामुळे इथे शिस्त लागेल, असे बहुतेक महामंडलेश्वर यांनी म्हटले होते. काल जे घडले ती एक राजकीय दुर्घटना आहे. त्याला राजकीय नेते जबाबदार आहे. आणि योगी सरकार, केंद्र सरकारचे व्हीआयपी, व्हीव्हीआयपी कल्चर जबाबदार आहे. ज्या प्रकारे संपूर्ण यंत्रणा व्हीव्हीआपींच्या सेवेत लागली आहे, तिथे सामान्य भाविकांना वाऱ्यावर सोडले गेले. अमृतस्नानासाठी तिथे कोट्यवधी लोक आले होते. भाजपाला वाटले हे सगळे आपल्या पक्षाचेच लोक आहेत. जे आपल्यालाच मत देतात, ते कुठे जातील. सगळे मोदींचे अंध भक्त आहेत. लोक आले पण त्यांची काहीच व्यवस्था नव्हती, असा घणाघात राऊतांनी केला.
तर, प्रशासनाला आणि सरकारला हे माहित होते. पण रोज 20 कोटी येणार, 10 कोटी येणार, 3 कोटी येणार असे आकडे करून कुंभमेळ्याचे एक प्रकारे राजकीय मार्केटिंग सुरू होते. त्यात भारतीय जनता पक्षाच्या व्हीव्हीआयपींनी, राजकीय व्हीव्हीआयपींनी अशा वेळेला दूर राहीले पाहिजे होते. संरक्षण मंत्री, देशाचे गृहमंत्री अन्य केंद्रीय मंत्री यांच्यासाठी एक-एक दिवस तो संपूर्ण परिसर बंद करण्यात आला. अन्य मंत्री किंवा अन्य व्हीआयपींसाठी हीच व्यवस्था लावल्यावर एक-एक दिवस भाविक हे प्रत्यक्ष त्या स्नानासाठी पोहोचू न शकल्याने ती गर्दी वाढली. त्यातून हा पहाटेचा प्रसंग घडला. कोणतीही व्यवस्था नाही, अॅम्ब्युलन्स नाहीत. वैद्यकीय सुविधा नाहीत. आर्मीच्या ताब्यात महाकुंभची व्यवस्था द्या, असे तिकडचे काही महामंडलेश्वर सांगत होते. पण तिथे राजकीय व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मृतांची संख्या वाढली. अनेकदा अशा गर्दीमुळे चेंगराचेंगरी होते. याला जबाबदार उत्तर प्रदेशचे योगी सरकार आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा… Mahakumbh Stampede : महाकुंभातील दुर्घटनेवर प्रसिद्ध लोकगायिकेची संतप्त प्रतिक्रिया
कुंभमेळ्यासाठी 10 हजार कोटींचे बजेट करण्यात आले. पण सांगितले जाते की, प्रत्यक्षात एक हजार कोटींच्यावर खर्च झालेला नाही. म्हणजे कुंभमेळ्यामध्ये साधारण 8 ते 9 हजार कोटींचा हिशेब लागणारच नाही. आता तिथे किरीट सोमय्यांना पाठवायचे आहे. किरीट सोमय्या जे भाजपाचे, सरकारचे, मोदी-शहा आणि ईडीचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांनी तिथे प्रत्यक्ष जायला पाहिजे. 10 हजार कोटींचा कुंभमेळा 01 हजार कोटीत कसा अटोपला? 9 हजार कोटी कोणाच्या खात्यावर गेले? कोणत्या संस्था? कोणत्या संघटना? कोण राजकारणी? याचा त्यांनी सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल ईडीला द्यायला पाहिजे, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
तर, महाराष्ट्रातले काही लोक तिथे होते. त्यांचा आक्रोश आपण पाहिला असेल. कशा प्रकारे व्यवस्था होती? कशा प्रकारे लोकांना तुडवले गेले? कशा प्रकारे या अपघातानंतर दुर्लक्ष झाले? हे महाराष्ट्रातल्या असंख्य भाविकांनी प्रयागराजमध्ये वृत्तवाहिन्यांवर येऊन सांगितले. हा अत्यंत गंभीर विषय आहे. योगी असतील, मोदी असतील, अमित शहा असतील या सगळ्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि जे 100 लोकं मृत झाले आहे, तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करणार आहेत? याचे आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.