मुंबई : मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी (ता. 19 नोव्हेंबर) विरारमध्ये मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैशांच्या बॅगेसह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी मोठा गोंधळ तर झालाच पण बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण देखील केली. बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी तर भाजपाच्याच नेत्यांनी विनोद तावडे पाच कोटी रुपये वाटपासाठी येत असल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी ऑन कॅमेरा 10 लाख रुपयांची रोकड बविआ नेते क्षितिज ठाकूर यांनी शोधून काढली. ज्यानंतर या मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. विरारच्या हॉटेलमध्ये सापडलेले बाकीचे पैसे कुठे गेले? तिथे पाच कोटी नाही तर पूर्ण हॉटेलमध्ये 15 कोटी रुपये सापडले आहेत, असा दावाही खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut raised question on Vinod Tawde money distribution case)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता. 20 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विरारमध्ये झालेल्या राड्याविषयी विचारणा करण्यात आली. यावेळी ते म्हणाले की, नालासोपाऱ्यात काल मंगळवारी (ता. 19 नोव्हेंबर) करोडो रुपयांचा व्यवहार झाला आहे. त्या हॉटलेच्या एका खोलीत पाच करोड रुपये होते, हे मी बोलत नसून कॅमेराने रेकॉर्ड केलेल्या गोष्टी आहेत. पूर्ण हॉटेलमध्ये 15 करोड होते, अशीही माहिती आहे. त्यामुळे ते पैसे गेले कुठे? कारवाईत केवळ 09 लाख रुपये दाखवण्यात आले आहेत, असा दावा राऊतांनी केला आहे. तर, ज्या एफआयआरची नोंद करण्यात आली आहे, ती पैसे वाटपासाठी करण्यात आली नसून ती एफआयआर आचारसंहितेच्या भंगाप्रकरणी करण्यात आली आहे. फालतू गोष्टींसाठी एफआयआरची नोंद करण्यात आली आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.
तसेच, एक दिवस आधी नाशिकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पैसे पकडण्यात आले. त्याआधी अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. दोन्ही चर्चांवरील लक्ष उडवण्यात यावे म्हणून विरारमध्ये तावडे पैसे घेऊन आल्याची टीप दिली. त्यानंतर हा गोंधळ सुरू झाला. भाजपाचे लोक पैसे वाटण्यात अत्यंत चाणाक्ष आणि हुशार आहेत. देशभरात पैशाचे वाटप कसे करावे याचे उत्तम ज्ञान भाजपाकडे असल्याने विनोद तावडेंसारखे कसलेला खेळाडू काही चूक करेल असे वाटत नाही. पण ही चूक का झाली? कारण त्यांच्याच सरकारमधील काही लोकांनी माहिती दिली की तिथे पैसे वाटप सुरू आहे, असा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे.
खासदार संजय राऊत यांनी याआधी सुद्धा पुण्यात जप्त करण्यात आलेल्या पैशांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. महिन्याभरापूर्वी म्हणजेच 21 ऑक्टोबरला खेड शिवापूर मार्गावर एका कारमधून 5 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. पण त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या इतर दोन गाड्यांमध्ये 15 करोड रुपये असल्याचा दावा राऊतांनी केला होता. एकनाथ शिंदे यांनी आपल्या माणसांना 50 करोड रुपये निवडणुका जिंकण्यासाठी देण्याची व्यवस्था केली आहे. त्यातील 15 करोड रुपयांचा पहिला हप्ता सर्वांना जात आहे, असा दावाही राऊतांनी केला होता. तसेच, आचारसंहिता लागली त्या रात्रीच मोठ्या रकमा पोहचवण्यात आल्याचेही राऊतांनी म्हटले होते.