यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही; संजय राऊतांची माहिती

sanjay Raut
यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही; संजय राऊतांची माहिती

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याविषयी मोठं भाष्य केलं आहे. यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. (ShivSena Dasara Melava) यंदाचा दसरा मेळावा प्रत्यक्ष व्हावा अशी इच्छा आहे, असं राऊत म्हणाले. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीनं पार पडला होता. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

यंदाचा दसरा मेळावा हा नक्कीच होणार, आणि तो ऑनलाईन नक्कीच होणार नाही. दसरा मेळावा चांगला व्हावा अशी आमची भूमिका आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं देखील तेच मत आहे. नियमांचं पालन करुन हा मेळावा कसा करता येईल यासंदर्भात चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्यानुसार तो होईल, असं राऊत म्हणाले.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ऑनलाईन पद्धतीने पार पडला. परंतु आता कोरोनाचं संकट ओसरु लागलं असून मुंबईला तिसऱ्या लाटेचा कसलाही धोका नसल्याचं कालच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

लखीमपूर घटनेवरुन भाजपवर टीकास्त्र

सरकारी यंत्रणांचा वापर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यात राजकारण काय, हे विरोधकांचं कर्तव्य आहे, असं राऊत म्हणाले. राहुल गांधींना जाऊ दिले जाणार नाही. लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी केली जात आहे. सरकार विरोधी बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.