घरमहाराष्ट्रसंविधान, कायदा, लोकशाही यांचा मुडदा कुणी पाडू शकला नाही; संजय राऊतांचा विश्वास

संविधान, कायदा, लोकशाही यांचा मुडदा कुणी पाडू शकला नाही; संजय राऊतांचा विश्वास

Subscribe

खरी शिवसेना कुणाची हे पहायचं असेल तर निवडणूकांना सामोरे जा, यासाठी आमचीही तयारी आहे." असा म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान दिलंय.

गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे वकिल एकमेकांचे दावे खोडून काढण्याकरता अभ्यासपूर्ण प्रतिवाद करत आहेत. याप्रकरणी आजही युक्तिवाद पार पडला असून आजचा निकाल पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने राखून ठेवला आहे. कोर्टातील सुनावणीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. “न्यायालय जिवंत आहे आणि आमचा न्यायालयावर विश्वास आहे. “खरी शिवसेना कुणाची हे पहायचं असेल तर निवडणूकांना सामोरे जा, यासाठी आमचीही तयारी आहे.” असा म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान दिलंय.

दिल्लीत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणीनंतर त्यावर बोलताना संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. यावेळी ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि फुटीर गट हे निकाल आपल्या बाजूने लागेल, चिन्ह आम्हालाच मिळेल, असं सांगत आहेत. नारायण राणे यांनी तर मोठ्या खात्रीने सांगितलं होतं, हे ठामपणे नारायण राणे कसं सांगू शकतात, याबाबत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय.

- Advertisement -

यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजुनही या देशातला न्याय मेलेला नाही. या देशाचे संविधान, कायदा, लोकशाही यांचा मुडदा कुणी पाडू शकला नाही. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आमचा विश्वास आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे,” असं म्हणत संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केलाय.

- Advertisement -

खरी शिवसेना कुणाची यावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हेच खरं सत्य आहे आणि या सत्याचा विजय होईल, या भुमिकेवर आम्ही ठाम आहोत.”

यावेळी शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देत संजय राऊत म्हणाले की, “खरी शिवसेना कुणाची हे पाहण्यासाठी सुनावणी आणि तारखांचा घोळ घालण्यापेक्षा जनतेत जाऊ, निवडणूकांना सामोरे जाऊ, जनता ठरवेल. जर भविष्यात न्यायालयाने निवडणूकांना सामोरे आणि खरी शिवसेना कोणती हे लोकांमधून ठरवा, असं सांगितलं तरी आमची तयार आहे.”

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह हे शिवनेरी किल्ल्यावर दर्शनासाठी येत आहेत. यावरून संजय राऊत यांनी अमित शाह यांना देखील सुनावलंय. “गल्ली गल्लीत शिवजयंती शिवसेनेमुळेच साजरी होते, केवळ स्वार्थासाठी आणि निवडणूकांसाठी भाजपला शिवाजी महाराज आठवले, पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी बेईमानांची बोटं छाटली होती हे त्यांनी विसरू नये. शिवनेरीवरंच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा जन्म झाला होता, याच शिवनेरीची माती घेऊन आम्ही आयोध्येला राम मंदीर निर्माण करण्यासाठी दिली होती. महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी करणाऱ्यांना अमित शहा आणि त्यांचा पक्ष पाठीशी घालतोय. पण बेईमानांची बोटं छाटणारा हा महाराष्ट्र आहे.” असं म्हणत संजय राऊत यांनी अमित शहांना इशारा दिलाय.

तसंच कोर्टाचा निर्णय हा स्पष्ट आणि पारदर्शक असावा, अशी अपेक्षा देखील संजय राऊतांनी व्यक्त केलीय. महाराष्ट्राचं राजकारण गढूळ झालंय, कुणीही येतं आणि पक्ष फोडतं, पक्षावर ताबा सांगतो, यावर कायम आळा बसावा, अशी मागणी संजय राऊतांनी केलीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -