मुंबई : खोके-खोके म्हणून बाप बेटे थकले आहेत, आम्ही तोंड उघडू त्यावेळी उद्धव ठाकरे यांना परदेशात जावे लागेल. लंडन, अमेरिका, श्रीलंका या ठिकाणी कुणाचे काय आहे, हे सांगायला लावू नका, अशी वॉर्निंग शिवसेना ( शिंदे गट ) नेते, रामदास कदम यांनी दिली होती. याला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी कदम यांना प्रत्युत्तर दिले आहे.
ज्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना आयुष्यभर सत्तेची पदे आणि वैभव दिले, त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करणे, नैतिकता आणि माणुसकीला धरून नाही, अशा शब्दांत राऊत यांनी कदम यांना फटकारले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
कदमांच्या विधानाबद्दल पत्रकाराने विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “बापरे… दुसऱ्यांना तोंडे नाहीत का? तोंडे सगळ्यांना आहेत. कसे असते, बाटगा जोरात बांग देतो. या विषयावर फार चर्चा न केलेली बरी. त्यांचा ( कदम ) शत्रू कोण आहेत, हे त्यांनी ठरवायला हवे. ज्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना ( कदम ) आयुष्यभर सत्तेची पदे आणि वैभव दिले, त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करणे, नैतिकता आणि माणुसकीला धरून नाही.”
“आज तुम्ही सत्तेवर आहात, उद्या नसाल, हे लक्षात घ्या. मग अशाप्रकारची वक्तव्ये करा. कधी आपण सहकारी होतो, उद्धव ठाकरे तुमचे नेते होते. आपण त्यांच्यासोबत तासंनतास चर्चा केली. आमदारकी आणि मंत्रीपद मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांना दोनवेळा विधानपरिषदेवर पाठवले होते. ही कृतज्ञता माणसात आणि राजकारणात नसेल, तर माणुसकी शुन्य आहे,” असं म्हणत राऊतांनी कदमांना सुनावले आहे.
रामदास कदम काय म्हणालेले?
“आतापर्यंत खोके म्हणून बाप-बेटे थकले आहेत, आम्ही तोंड उघडू त्यावेळी मात्र यांना देशाबाहेर पळण्याची वेळ येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात महायुती विजयी झाली. आता तुम्ही उपमुख्यमंत्री झाला आहात, दोन पावले पुढे टाकताना कधीतरी चार पावले मागेही आले पाहिजे, असे सांगतानाच, कोकण हा सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. महाराष्ट्राचा वाघ कणखर, अशा एकनाथ शिंदेंच्या पाठिशी कोकण काल होता, आज आहे आणि उद्याही राहिल,” असे कदमांनी म्हटले होते.