‘त्या’ चार लोकांमुळेच गेले अडीच वर्ष तुम्ही सत्तेत राहिलात, संजय राऊतांचे प्रत्युत्तर

शिंदे गटाने केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी आज उत्तर दिले . यावेळी त्यांनी 'त्या' चार लोकांमुळेच गेले अडीच वर्ष तुम्ही सत्तेत राहिलात, असा पलटवार केला.

shiv sena mp eknath shinde critisizes bjp modi govt and shinde group

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद तीव्र होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावाला उत्तर देताना चौफेर फटकेबारी करत अनेक खुलासे करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. या टीकेला संजय राऊत यांनी आज उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील. दोघांनी राज्यातील हितासाठी काम करायला हवे. त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते चार लोके पक्षाचे काम करत होते. आजही करत आहेत. गेली अडीच वर्ष का होईना तुम्ही सत्तेत राहिलात. तेव्हाही राहिलात. तेव्हाही हे चार लोकंच होती. आता त्यांना तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात. पण उद्धव ठाकरे हे दुधखुळे नाहीयेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाना हवा असतो. ते काहीही बहाना शोधतात. ठिक आहे. तुम्ही निघून गेला. बहाणे देऊ नका. मंत्री आहात तर काम करा, अशा शब्दात संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील आणि बंडखोरांना फटकारले

राणे आणि भुजबळांचे  भाषणही त्याच पद्धतीचे –

शिंदे यांचे भाषण चांगले झाले असेल. मी दिल्लीला होतो. प्रवासात होतो. मी आता भाषण वाचले. मुख्यमंत्री विश्वास ठराव जिंकतात तेव्हा त्यांना भूमिका मांडावी लागते. त्यांनी राज्याच्या हितासाठी काय करणार हे सांगण्याऐवजी पक्ष का सोडला याचा खुलासा करत होते. राणेंचे भाषणही असंच होते. तुम्ही राणेंचे भाषण ऐकले असेल तर त्यावेळी विधानसभेत राणे असेच बोलले होते. भुजबळांचे भाषणही याच पद्धतीचे होते. पक्ष सोडणारा नेता दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा असे खुलासे करावे लागतात. माझ्यावरच कसा अन्याय झाला. मीच कसा बरोबर आहे. हे सांगावे लागते. जनतेच्या भावनेला हात घालावा लागतो. त्या पद्धतीने त्यांचे उत्तम भाषण झाले, असा चिमटाही त्यांनी काढला.