नवी दिल्ली : न्यायालय हे विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात, असे विधान भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीत केले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालय हे कोणत्या एक पक्षाच्या सांगण्यावरून काम करू शकत नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. न्याय द्या, निकाल द्या, एवढीच मागणी आम्ही केली होती. त्यांना काही समजते का? ते मोठे कायदे पंडीत आहेत, असे म्हणत राऊतांनी थेट माजी सरन्यायाधीशांवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता. 27 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. (Sanjay Raut response to former Chief Justice DY Chandrachud statement)
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. याबाबत प्रसार माध्यमांसमोर राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या वारंवार निदर्शनास आणून देऊन सुद्धा बंद पडलेला ईव्हीएम, बिघडलेला ईव्हीएम, ईव्हीएममधील घोटाळे, बटण दाबायचे एक आणि व्हीव्हीपॅट दुसरा जात आहे, हे दाखवून सुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे मालक आहेत, ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीचे अंत्यसंस्कार झाले आहेत. तर, न्यायालय हे सरकारची की भ्रष्टाचाऱ्यांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत. देशाच्या सरन्यायाधीश पदी पोहोचलेली ती व्यक्ती असून आम्ही त्यांचा आदर करतो. मला त्याविषयी काय म्हणायचे नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा, असे त्यांना कोणी सांगितले आहे. त्यांना काही समजते का? असा प्रश्नच राऊतांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा… Sanjay Raut : भाजपाला मिळालेले यश देशासाठी, राज्यासाठी घातक; राऊतांचा हल्लाबोल
तसेच, चंद्रचूड हे मोठे कायदे पंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, इतकेच आमचे त्यांच्याकडे म्हणणे होते. आम्ही दुसरे काही सांगितले नव्हते. जो निकाल असेल तो द्या, त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी, अशा तऱ्हेने दरवाजे, खिडक्या उघडून गेले आहेत. कधीही, कोणीही पक्ष बदला किंवा सरकार बदला किंवा ती पाडा, असे त्यांनी काम केले आहे. देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती, की त्यांनी घटनेचे, कायद्याचे, संविधानाचे, नितीमत्तेचे रक्षण करणे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकले काय? विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी हा प्रश्न नाही. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून भूमिका त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करत होतो, असे खडेबोलच राऊतांनी माजी सरन्यायाधीशांना सुनावले आहेत.
इतकेच नाही तर खासदार राऊतांनी यावेळी सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जी याचिका फेटाळली, त्यावरही भाष्य केले आहे. याबाबत ते म्हणाले की, न्यायालय म्हणते की तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, पण हारल्यावर करता. पण न्यायालयाने सांगितलेले हे चुकीचे आहे. गेल्या 10 वर्षातील ट्रॅक रेकॉर्ड पाहा. आम्ही जिंकलो तरी म्हटले आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हारलो तरी म्हणतोय की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमच्या पक्षाचे अनेक लोक गेली 10 वर्ष वारंवार ही मागणी करत आहेत, आता न्यायालयावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा. तुम्ही विरोधी पक्षाचे म्हणणे ऐकून घ्या, असे आम्ही म्हणत नाही. पण आम्ही विरोधी पक्ष आहोत. पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातील जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नसेल आणि तरीही न्यायालय ती प्रक्रिया पुढे रेटत असेल तर या देशातल्या सर्व संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत, असा आरोप राऊतांकडून करण्यात आलेला आहे.