Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रSanjay Raut : ...तर अमित शहा 'मातोश्री'वर येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, संजय राऊतांचे विधान

Sanjay Raut : …तर अमित शहा ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, संजय राऊतांचे विधान

Subscribe

मुंबई : दोन तास ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या. अमित शहा सुद्धा ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असे विधान शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर… सत्ता नसल्यावर यांचे सगळे दुकान रिकामे होईल, अशी टीकाही संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, “भास्कर जाधव हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. जाधव यांच्या कुटुंबात लग्नकार्य असल्याने ते शनिवारी ‘मातोश्री’वर बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मांडलेल्या भूमिकांवर आम्ही पक्षात चर्चा करतो. जाधव हे एकनाथ शिंदे नाहीत. रूसून फुगून गावी जायचा. शिवसेनेचे प्रमुख नेते कोकणात एकत्र जाण्याच्या विचारात आहेत.”

ऑपरेशन टायगरला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत का? असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत यांनी म्हटले, “उद्धव ठाकरे कधी सक्रिय नव्हते? कसले ऑपरेशन टायगर? सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर… सत्ता नसल्यावर यांचे सगळे दुकान रिकामे होईल…”

“दोन तास ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या. अमित शहा सुद्धा ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनेत प्रवेश करतील. चंद्रशेखर बावनकुळेंपासून सगळे कलानगरच्या दारात दिसतील. ही सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. आम्ही सुद्धा सत्ता भोगली आहे. इतक्या विकृतपणे आणि सुडबुद्धीने आम्ही सत्ता राबविली नाही,” असं राऊत यांनी म्हटले.