घरमहाराष्ट्र'ढोंग्यांनी आम्हाला सावरकर सांगू नये, गोमातेबद्दल सावरकरांचे विचार भाजपला मान्य आहे का?'

‘ढोंग्यांनी आम्हाला सावरकर सांगू नये, गोमातेबद्दल सावरकरांचे विचार भाजपला मान्य आहे का?’

Subscribe

मुंबई – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला असल्याचा दावा करत भाजपाने त्यांच्याविरोधात षड्डू ठोकला आहे. शिवसेनेचं हिंदुत्त्व खरं असेल तर त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून मविआतून बाहेर पडावं असं म्हटलं जात आहे. राहुल गांधींच्या भूमिकेशी शिवसेना सहमत आहे की नाही यावर चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी मालेगावातील सभेत राहुल गांधींना सज्जड दम भरला. तसंच, आज संजय राऊतांनीही महत्त्वाचं विधान केलं आहे. ‘ढोंग्यांनी आम्हाला सावरकर सांगू नये, गोमातेबद्दल सावरकरांचे विचार भाजपला मान्य आहे का?’ असा प्रश्नही त्यांनी आज उपस्थित केला. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या कारणावरून विरोधी पक्षांच्या गेल्या दोन दिवसांपासून बैठका सुरू आहेत. या बैठकांना शिवसेनेचे सदस्य उपस्थित नाहीत. याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, “विरोधी पक्षाच्या बैठकींना शिवसेना गेली नाही. आजही जाणार नाही. परंतु, काल माझी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसोबत चर्चा झाली आहे. काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली आहे. या चर्चेतून मार्ग निघेल.”

- Advertisement -


सावरकर स्मारकाच्या उभारणीत बाळासाहेबांचं योगदान

“स्वातंत्र्यवीर सावरकर महान क्रांतीकारक, समाजसुधारक होते. शिवेसनेला त्यांच्याविषयी कायम आदर आहे. त्यामुळे या ढोंग्यांनी वीर सावरकर सांगण्याची गरज नाही. आम्ही सावरकर जगतोय आणि जपतोय. सावरकरांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीत बाळासाहेबांचं मोठं योगदान होतं,” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हे तर अदानी, खुर्ची बचाव यात्रा

“सावरकरांचं हिंदुत्त्व आम्ही स्वीकारलं आहे. सावरकरांप्रमाणेच आमचं हिंदुत्त्व शेंडी जाणव्याचं नाही. विज्ञानवादी आहे. सावरकरांची गोमातेविषयी असलेली भूमिका भाजपाला मान्य आहे का? हे खुर्ची बचाव ढोंग सुरू आहे. मुख्यमंत्र्याना सावरकरांच्या तीन क्रांतीकारक बंधुची नावे विचारा. सावरकरांचा जन्म कुठे झाला हे माहितेय का? त्यांच्या महान त्यागमूर्ती पत्नीचं नाव माहिती आहे का? सावरकरांचा वारंवार अपमान करू नका. आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू. दिल्लीतही आमची भूमिका स्पष्ट करू,” असं संजय राऊत म्हणाले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कागद वाचून दाखवत होते. ज्यांच्या हृदयात सावरकर असते तर त्यांनी उत्स्फूर्तपणे मानवंदना द्यायला हवी होती. पण ते उपमुख्यमंत्र्यांना विचारतात वाचू का, यालाच गुलामी म्हणतात. अदानी बचाव यात्रा सुरू आहे. अदानीने केलेल्या लुटमारीचं लक्ष विचलीत व्हावं म्हणून अदानी गौरव यात्रा काढत आहेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -