पुणे : राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलली आहेत. कारण जे एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, ते आता उपमुख्यमंत्री बनले आहेत. तर जे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, ते आता मुख्यमंत्री आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला उपमुख्यमंत्री होण्यास नकार दिला होता, ते नाराजीनाट्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. ज्याबाबत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला उपमुख्यमंत्री होण्यास नकार दिला, मात्र सर्व आमदारांनी आग्रह केल्याने त्यांचा मान ठेवत शिंदेंनी हे पद स्वीकारले, असे पाटलांकडून सांगण्यात आले. ज्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी शिंदेंवर खोचक टीका केली आहे. (Sanjay Raut sharp criticism on Eknath Shinde accepting post of Deputy Chief Minister)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 27 जानेवारी) पुण्यातून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंकडे कसले गौप्यस्फोट आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी हायकमांडचा मान राखला. काही करून सत्तेत राहायचे ही यांची भूमिका आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली. त्यांना 2024 नंतर मुख्यमंत्री ठेवण्याचे आश्वासन दिले होते, तरीही ते मुख्यमंत्री झाले नाही. मग कार्यकर्त्यांचा मान राखण्याचा प्रश्न येतो कुठे. ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांचे हायकमांड भाजपा आहे, त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदेंचीही हायकमांड भाजपा आहे, असा खोचक टोला राऊतांनी लगावला.
हेही वाचा… Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याबाबत राऊतांचे मोठे विधान
तसेच, त्यांनी (भाजपाने) आदेश दिला, तो यांना स्वीकारावा लागला. याचा मान राखला, त्याचा मान राखला हे तर्कसंगत नाही. फडणवीस यांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला, त्याच हायकमांडचा आदेश शिंदेंनी पाळला. असेही त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नसते तर त्यांनी काय केले असते. त्यांच्याकडे पर्याय काय होते? कोणताही पर्याय नव्हता. कातडी वाचवण्यासाठी, खटले थांबवण्यासाठी सरकारमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असा घणाघाती टोलाही खासदार संजय राऊत यांनी वेळी लगावला. तर तो त्यांचा प्रश्न आहे, असेही यावेळी राऊतांनी म्हटले. पण आता राऊतांच्या या टीकेवर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.