इंदापूर : देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी म्हणाले. मी पुन्ही आलो. पण कसा आलो दोन पक्ष फोडून आलो, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. इंदापूर येथे महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. (Sanjay Raut Shiv Sena leader slams BJP leader and dcm devendra fadnavis)
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी म्हणाले. मी पुन्ही आलो. पण कसा आलो दोन पक्ष फोडून आलो. काय शिक्षण काय आहे? राजकारणातला माणूस सांगतो की, मी लोकांना सुविधा पुरवल्या. मी लोकांचं जीवनमान उंचावलं म्हणून मी राजकारणात आहे. पण हे महाशय (देवेंद्र फडणवीस) म्हणतात की, मी आलो दोन..दोन पक्ष फोडून आलो”, असे टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
“पण मी त्यांना सांगू इच्छितो की चार महिन्यांनी सरकार बदलणार आहे आमची गॅरेंटी आहे की, महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात पंतप्रधान मोदी नसतील. सत्ता आमच्याकडे असेल. तुम्ही पक्ष फोडले ते, इडी आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले. पण ही यंत्रणा उद्या आमच्या हातात येणार आहे. तेव्हा तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का, ते पाहा”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
“मला सुप्रिया सुळेंचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की, मला अटक होण्याची शक्यता आहे. तसेच, रोहित आणि युगेंद्र पवार यांना अडवून सांगितलं जातं आहे की, तुम्ही प्रचार करू नका. पण तुमच्या हिंमत असेल तर, तुम्ही प्रचार करा आणि बारमतीत निवडून येऊन दाखवा. ही लढाई केवळ बारामतीची नाही तर, संपूर्ण महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई आहे. या भागांत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची गरज नाही. पण तुमची दादागिरी, हा तुमचा दहशतवादी, तुमच्या धमक्या आणि बारमतीचे कुणी गुजरात करू पाहत असेल, तर याठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहिल. आमची गुजरातशी लढाई नाही. गुजरातच्या जनतेशी लढाई नाही. पण सध्याची जी वृत्ती आहे. त्या वृत्तीला पायबंदी घातली पाहिजे. माणसं विकास कामांवर मतं मागतात. पण आता जे धमक्या देऊन मतं मागत आहेत, त्यांनी मागील काळात विकास केला नाही, असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला धमक्या द्यायची वेळ का येतेय कारण लोकं तुमच्या सोबत नाहीत”, असे म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.
हेही वाचा – SANJAY RAUT : बारामतीत धमक्या द्याल पण तुम्हाला मुंबईत यायचंय; संजय राऊतांचा अजितदादांना इशारा