नवी दिल्ली : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशामध्ये मंगळवारी (18 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनावणे यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. तर, दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या घडामोडींवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Sanjay Raut Shivsena UBT on massajog beed politics)
हेही वाचा : Supriya Sule : वाल्मिक कराडची हिंमतच कशी होते? सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, फडणवीसांसमोर पदर परसून…
खासदार संजय राऊत म्हणाले की, “मस्साजोग ग्रामस्थांचा आवाज कोणीही ऐकला नाही. हे सरकार मूकबधिर झाले असून या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना कोणाला तरी वाचवायचे आहे. त्यांचा तो जुना मित्रपरिवार आहे.” असा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. तसेच, “भाजप युवा मोर्चामधील त्यांच्या सहकाऱ्याला वाचवायचे आहे. त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्यायला पाहिजे. आमच्या काळामध्ये मनोहर जोशींचा सरकार असताना नैतिकतेच्या मुद्द्यावर तीन मंत्र्यांचा राजीनामा घेतला होता. नैतिकतेच्या मुद्द्यावर आम्ही संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला, जे आता त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत.” असे म्हणत त्यांनी टीका केली.
राज्यात वाय झेड करून टाकली – संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात, त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितले आहे की फडणवीसांचे आदेश पाळू नका. अशा प्रकारचे आवाहन एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झाले होते. आता मंत्रालयातदेखील अंडरवर्ल्ड सुरू आहे.” असे गंभीर आरोप त्यांनी यावेळी केले. तसेच ते पुढे म्हणाले की, “गद्दारांनी या राज्यात वाय झेड करून टाकली आहे हे वेड्यांचे सरकार आहे. मंत्रालयात वेड्यांची जत्रा असून सर्व गोंधळ सुरू आहे. गृहनिर्माण खात्यामध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे.” असा आरोप त्यांनी यावेळी केला. “म्हाडाच्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेत अधिकाऱ्याची नेमणूक संबंधित मंत्र्यांना रोकड देऊन केली जाते. लवकरच कोणत्या प्रकल्पासाठी किती पैसे दिले गेले? याची माहिती मी उघड करेन,” असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.