नवी दिल्ली : “मुंबईमध्ये एकप्रकारचे अराजक निर्माण झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी माणसांवर हल्ले सुरू झाले आहेत. मराठी माणसांचे उद्योग, त्यांचा व्यापार, त्यांच्या नोकऱ्या बळकावल्या जात आहेत. मुंबईत गुजराती, मारवाडी बोला, ही मुंबई भाजपने जिंकली आहे. पण मुंबईत मराठी बोलायचे नाही, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.” असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. (Sanjay Raut Shivsena UBT on Mumbai language clash with marathi issues)
हेही वाचा : Mahayuti Oath Ceremony : आझाद मैदानात फक्त तीन जणांचा शपथविधी, काय आहे कारण ?
देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे मोहित कंबोज यांनी ट्विटरवर गजाभाऊ नावाच्या एका अकाऊंटला थेट उचलून आणण्याची धमकी दिली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “टीका केली म्हणून मराठी माणसाला उचलून आणून मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची माणसे जी अमराठी आहेत त्यांच्याकडून ही कामे होत आहेत. शिवसेना म्हणवून घेणारी डुप्लिकेट शिवसेना पक्ष हा सरकारमध्ये सहभागी आहे. मुंबईमध्ये सध्या हे चित्र दिसत आहे. हे चित्र महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर आहे.” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“मुंबई ही मराठी माणसाच्या त्यागातून आणि कष्टातून निर्माण झाली आहे. 10 फुट जरी जमीन खोदली तरीही तुम्हाला मराठी माणसाचेच रक्त सांडलेले दिसेल. मराठी माणसाचे बलिदान दिसेल. ही आंदोलने मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि संस्कृतीसाठी झाले आहे. भाजपचा राज्यात विजय होताच, महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी बोलायचे नाही, अशा धमक्या दिल्या जातात. हे असे होत असताना राज्याचे होणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे सहन करत आहेत, ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे.” असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मराठी माणसाच्या दुश्मनांच्या हातात मुंबई सोपवण्याची भूमिका कोणी घेतली? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला.
मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचा
भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या ट्विटवरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. “मुंबईत गुजराती, मारवाडी विरुद्ध मराठी असा वाद कोणी लावला? वाद लावण्याचे काम हे भाजपने केले आहे. या निवडणुकीत गुजराती, मारवाडी आणि जैन बांधवांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेऊन मराठी माणसांच्या विरोधात उभे करण्याचे काम हे भाजपचे आहे. आम्ही इतकी वर्ष मुंबईमध्ये राहत आहोत. तेव्हाही इथे अन्य भाषिक नागरिक राहत होते. पण आम्ही कधीही अन्य भाषिकांना अशामध्ये प्रकारच्या धमक्या दिल्या नाहीत.” असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.