मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (ता. 18 नोव्हेंबर) चार अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ठार मारण्याच्या प्रयत्नातून हल्ला करण्यात आल्याचे राऊतांनी म्हटले आहे. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. (Sanjay Raut shocking statement regarding attack on former Home Minister Anil Deshmukh)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. 19 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त करत म्हटले की, अनिल देशमुख यांच्यावर नागपुरात हल्ला झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. हा हल्ला करताना भाजपe जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याचे माजी गृहमंत्री देशमुख यांना ठार मारण्याच्या हेतूने हल्ला होतो. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते. या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत आणि त्यासाठी शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. निवडणूक काळात राज्याच्या प्रशासनाची सर्व सुत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात. तरीही भाजपाच्या काळात गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो. निवडणूक आयोग हा त्यांच्याच हातात असतो, त्यांचीच माणसं असतात, त्यांचीच माणसं हातात हात धरून काम करतात. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर अला निर्घृण हल्ला झाला कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली आहे, असे म्हणत राऊतांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा… Anil Deshmukh : हल्ल्यावेळी नेमके काय घडले? देशमुखांचे स्वीय सहाय्यकांनी सांगितला घटनाक्रम
तसेच, उद्या राज्यात मतदान होणार आहे त्यामुळे आम्हाला चिंता आहे की विरोधी पक्षाच्या किती नेत्यांना धमक्या येतील? किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील? किती जणांवर खोटे गुन्हे दाखल केले जातील? या विषयी आम्हाला चिंता वाटते. कारण हे प्रकार राज्यभरात सुरू झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी अनिल देशमुख यांच्याशी फोनवर चर्चा केली. महाराष्ट्राला धक्का बसावा चिंता वाटावी असा हा कालचा प्रकार आहे असे संजय राऊतांनी म्हटले. तर, भाजपावाले म्हणतात हा स्टंट आहे, नरेंद्र मोदींकडून आम्ही स्टंट करायला नाही शिकलो. नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकायची गरज नाही, हे स्टंट जे आहेत तुमचे पंतप्रधान, तुमचे नेते कायम करत असतात. देशमुखांचे डोक किती फुटले ते बघा. देशमुखांचे चिंरजीव काटोलमधून उभे आहेत आणि ते निवडून येत आहेत. देशमुख स्वतः या मतदारसंघातून सात नेळा विजयी झालेले आहेत. मला तो मतदारसंघ माहीत आहे. ज्यामुळे आता भाजपाची ही नौटंकी सुरू आहे, असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.
महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते. माजी मंत्री, माजी गृहमंत्री यांच्यावर हल्ला झाला. असे वातावरण कोणत्याही निवडणुकीत झाले नव्हते. हे वातावरण देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या काळात झाले आहे. तिकडे मणिपूर पेटले आहे. महिलांना रस्त्यावर आणून त्यांची धिंड काढली जाते आणि त्यांच्यावर बलात्कार होता आहेत. इथे मंत्र्यांवर हल्ले होत आहेत. हे म्हणतात यांच्याच काळात कायदा सुव्यवस्था आहे, पण यांच्या काळात कायदा सुव्यवस्था सुरक्षित नाही, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.