अमरावतीसारख्या घटना घडू नयेत म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल ओतू नये; राऊतांचा टोला

sanjay raut and devendra fadnavis

अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहराला भेट दिली. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. अमरावतीसारख्या घटना घडू नयेत म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल ओतू नये, असा टोला राऊतांनी लगावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

इथे ठाकरे सरकार आहे. कायदेशीर कारवाई करताना गट तट पक्ष पाहिला जात नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्र होते. महाराष्ट्रामध्ये अमरावतीसारख्या घटना घडू नयेत यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता ती शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा टोला राऊतांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी अमरावतीसारख्या घटनांचं राजकारण, पेटवापेटवी महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा दंगलींसाठी ओळखला जाऊ नये, असं आवाहन राऊत यांनी केलं. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. अमरावतीच्याच्या बाजूला गडचिरोलीत याच पोलिसांनी, याच सरकारने २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला, असं संजय राऊत म्हणाले.

कायद्यापुढे सर्व समान आहेत. अमरावतीत दंगल कोणी पेटवली, कोणत्या कारणाने पेटवली, त्याच्या मागे कोण होतं, हे देशालाही माहिती आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना देखील माहिती आहे आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण शांत असताना उगाचच काड्या करण्याचं काम कोणीही करु नये, असं राऊत म्हणाले.

इंटिलिजंस फेल होतं, शेवटी ती माणसं आहेत. देशभरामध्ये इंटिलिजंस फेल होतात, काश्मीरमध्ये, त्रिपुरामध्ये होतं. तरीसुद्धा अमरावतीमधील दंगल नियंत्रणामध्ये आणली. अमरावतीत शांतता आहे, असं राऊत म्हणाले. अमरावतीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजप आंदोलन करणार आहे. यावर बोलताना भाजपवरक जोरदार निशाणा साधला. भाजप आक्रमक आहे, त्यांना परत दंगल करायची आहे का? असा सवाल करत कशासाठी आंदोलन करताय, जे काही होईल ते कायद्याने होईल, असं राऊत म्हणाले.

रझा अकादमीवर बंदी घालण्याच्या मागमीवर बोलताना राऊत यांनी रझा अकादमीवर तुम्ही का नाही बंदी घातली? असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला. दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री म्हणून सक्षम आहेत. ज्यांनी अमरावती पेटवली, ते कोणीही असु द्या, त्यांच्यावर कारवाई होणार. काही भाजपच्या नेत्यांवर कारवाई झाली म्हणजे हिंदूंवर कारवाई झाली असं नाही, असं संजय राऊत म्हणाले.