भाजपने १२ आमदारांची फाईल तुंबवून ठेवल्याप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा संप अडकवलाय, राऊतांचा खोचक निशाणा

sanjay raut slams bjp leaders on st workers strike

एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवण्याचे काम भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून केला आहे. भाजपने १२ आमदारांची फाईल ज्या प्रकारे तुंबवून ठेवली आहे त्याप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा संपही अडकवून ठेवला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले आणि राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांविषयी गांभीर्य नसल्याची तक्रार केली अशी तक्रार करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करा असा सल्ला राऊतांनी दिला आहे. तसेच भाजप नेत्यांनी राज्य सरकारविरोधात एसटी कर्मचाऱ्यांच्या हत्येवरुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे वक्तव्य केलं आहे. त्याप्रमाणे दिल्लीत शेतकऱ्यांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला त्याबद्दल कोणाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असा प्रश्न संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन कर्मचाऱ्यांची डोकी भडकवणाऱ्या भाजप नेत्यांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. भाजप नेते एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांना चिथावणी देण्याचे काम भाजप नेते करत आहेत. कर्मचारी सेवेत पुन्हा हजर राहत असताना भाजप समर्थकांकडून त्यांना हाणामारी केली जात असल्याचे सामना अग्रलेखात म्हटलं आहे. आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजप नेते घुसतात व शेवटपर्यंत लढण्याच्या गर्जना करतात आणि घरी जाऊन झोपतात. कर्मचारी आपला तिथेच मच्छर आणि दगडधोंड्यात असतो. फक्त लडायला तुम्ही आणि भाषण देण्यासाठी आम्ही अशा प्रकारे भाजप नेत्यांचे काम सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले.

कर्मचाऱ्यांना भडकावून काय साध्य होणार?

एसटीचे विलीनीकरण शासनात होणे शक्य नाही असे राज्य सरकार सांगत आहे. कारण त्याला कायदेशीर आधार आहे. परंतु त्यावर प्रकिया सुरु असताना भाजप एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवण्याचे काम करत आहे. भाजपच्या लोकांनाही माहिती आहे की, एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करता येणार नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकावून काय साध्य होणार? चर्चेतून मार्ग सोडवावा अशी राज्य सरकारची भूमिका आहे. अशाच आडमुठ्या धोरणांमुळे मुंबईतील लाखो गिरणी कामगार देशोधडीला लागले आहेत. मोदी सरकारच्या अपयशी नोटबंदीमुळे सध्या नोकरी टीकवणे फार महत्त्वाचे आहे. मोदी सरकारने सार्वजनिक उपक्रम विकायला काढले त्यावरुन मोदी सरकार हे उपक्रम चालवण्यात असमर्थ ठरले असल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु भाजप नेते एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर डोकी भडकवत आहेत. हे माणुसकीला धरुन नाही आहे. कामगार उध्वस्त झाला, त्यांच्या चुली विझल्या तरी चालतील पण आमचे पुढारीपण टिकले पाहिजे असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांच्या फिकीरीमुळे संयमाने पावलं

एसटी कर्मचाऱ्यांची फिकीर असल्यामुळे राज्य सरकारने संयमाने पावलं उचलली आहेत. एसटी महामंडळाचे विलीनीकरण हे राज्य सरकारमध्ये शक्य नाही हे विरोधी पक्षालाही माहिती आहे. असे असतानाही विरोधी पक्षाकडून कर्मचाऱ्यांना चिथावणी दिली जात आहे. कामागारांनी हे स्त स्वीकारले परंतु त्यांची भाजपच्या नेत्यांमुळे कोंडी झाली आहे. भाजपकडून ज्या प्रकारे १२ आमदारांची फाईल तुंबवली गेली आहे तसेच हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप अडकवला असल्याचे राऊत म्हणाले तसेच हे दहशत, ब्लॅकमेल आणि वैफल्याचे राजकारण असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी स्वतःचे नुकसान करुन घेऊ नये एवढी अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा : अनिल देशमुखांच्या अटकेचा एक-एक मिनिट वसूल करू