महाराष्ट्रात पेढे वाटणाऱ्यांना लाज नाही वाटत? संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा उतरवला तेव्हा तुमच्या तोंडात बोळकं का होते?

sanjay raut

बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाला असून बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. मराठी माणसाच्या पराभवानंतरही महाराष्ट्रात पेढे वाटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असे खडेबोल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहेत. आम्ही फार दुःखी आहोत बेळगावमधील मराठी माणूस हारला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या २० ते २२ जागा येण्याची शक्यता होती मात्र येत्या काळात तेथे काय कारस्थान झालं हे समजेल असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मराठी माणसाच्या पराभवाने सांगली, सातारा, कोल्हापुरातील लोकं अस्वस्थ असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी बेळगाव निवडणुकीबाबत माहिती दिली यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, किमान २० ते २२ जागा आम्ही जिंकू आणि आणखी एका दोन जणांच्या मदतीने मराठी माणूस महापालिकेत सत्ता स्थापन करेल अशी आमची खात्री होती. बेळगावमध्ये सातत्याने मराठी एकजुटीचा विजय झाला आहे. मग एकीकरण समिती आणि लहान पक्ष आहेत. आज २ ते ३ जागांवर विजय मिळाल्या असल्याचे समजले आहे. यावरुन समजते आहे तिकडे कशा प्रकारचे कारस्थान झाले आहे. मी ईव्हीएमवर खापर फोडणार नाही पण कर्नाटकच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगावमध्ये महाराष्ट्राचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली आहे याबाबत हळूहळू माहिती समोर येईल असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठी माणासाच्या बाबतीत गद्दारी

बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्याबद्दल महाराष्ट्रात काही जणांना आनंद झाला आहे. पेढे वाटत आहेत. त्यांना इतकेच सांगू शकतो की, महाराष्ट्रात आतापर्यंत इतकी नादानी आणि नालायकपणा मराठी माणासाच्या बाबतीत गद्दारी कोणी केली नव्हती. महाराष्ट्रात मराठी माणूस अस्वस्थ आहे आणि तुम्ही पेढे वाटतायत, ठिक आहे तुमचा पक्ष जिंकला असेल मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला आहे. पेढे वाटणाऱ्यांना मराठी माणूस माफ करणार नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बेळगावात मराठी माणसाने बलिदान दिलं आहे. १०५ हुतात्म्यांमध्ये बेळगावमधील मराठीसुद्धा आहेत. पेढे वाटत आहात मराठी माणूस हारल्यामुळे लाज नाही वाटत तुम्हाला, राजकारण बाजूला ठेवा पण मराठी माणूनस म्हणुन तुम्हाला लाज वाटली पाहिजे असे खडेबोल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहेत.

तेव्हा तुमच्या तोंडात बोळकं का होते?

जर तुमचा भगवा झेंडा खरंखर असेल तर जेव्हा कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा उतरवला तेव्हा तुमच्या तोंडात बोळकं का होते? मराठी माणसं, मुलांवर आरोप, गुन्हे दाखल होत आहेत तेव्हा तुम्ही का गप्प राहता? महाराष्ट्र एकिकरण समिती तिकडची मराठी माणसांची प्रातिनिधीक समिती आहे. कोणत्याही पक्षाची ही समिती नाही. आतापर्यंत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन या नेत्यांनीही या समितीला पाठिंबा दिला होता.