हिंदुत्वाच्या शाळेचे आम्ही हेडमास्तर – संजय राऊत

sanjay raut

‘आम्हाला देशभक्तीचं प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. आम्ही किती कठोर हिंदू आहोत त्याचं आम्हाला प्रमाणपत्र नकोय. ज्या शाळेत तुम्ही शिक्षण घेत आहात त्या शाळेचे हेडमास्तर आम्ही होऊन गेले आहोत. आमच्या शाळेचे हेडमास्तर बाळासाहेब ठाकरे होते. त्याचबरोबर अटलबिहारी वाजपेयी, सामाप्रसाद मुखर्जी देखील आमच्या शाळेचे हेडमास्तर होते’, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. आज राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधायकावर चर्चा सुरु आहे. राज्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत या विधेयकाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर विरोधकांकडून या विधेयकाला विरोध होत आहे. सध्या शिवसेना राज्यसभेत विरोधी बाकावर बसली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

आज देशाच्या बहुसंख्य भागात या विधेयकाला विरोध दर्शवला जात आहे. हिंसा होत आहे. आसाम, त्रिपोरा, मिझोराम, मनीपूर या भागांमध्ये विरोध केला जात आहे. एक मतप्रवाह समर्थनार्थ आहे तर दुसरा विरोधात आहे. मात्र, विरोध करणारे सुद्धा देशाचे नागरिक आहेत, ते देशद्रोही नाहीत. याशिवाय आम्हाला देशभक्तीचं प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. आम्ही किती कठोर हिंदू आहोत त्याचं आम्हाला प्रमाणपत्र नकोय. ज्या शाळेत तुम्ही शिक्षण घेत आहात त्या शाळेचे हेडमास्तर आम्ही होऊन गेलेलो आहोत. आमच्या शाळेचे हेडमास्तर बाळासाहेब ठाकरे होते. त्याचबरोबर अटलबिहारी वाजपेयी, सामाप्रसाद मुखर्जी देखील आमच्या शाळेचे हेडमास्तर होते.

नागरिकत्व दुरुस्ती विधायक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत आले आहे. याबाबत सभागृहात वेगवेगळे मतप्रवाह बघायला मिळाले. अशाप्रकारचे मतप्रवाह असणे आणि यावर सभागृहात चर्चा होणे म्हणजे हीच आपली लोकशाही आहे. परंतु, मी कालपासून ऐकतोय आणि पाहतोय की, जो या विधेयकाला समर्थन नाही करणार त्याला देशद्रोह आणि जो समर्थन करणार त्याला देशभक्त ठरवायचं. मी असंही एकलं की जे या विधेयकाचं समर्थन करणार नाहीत ते पाकिस्तानची भाषा करणारे ठरतील. मात्र, हे संसद पाकिस्तानचे तर नाही! सत्ताधारी असो किंवा विरोधक आम्ही या देशाचे नागरिक आहोत. देशाच्या जनतेने दोन्ही बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे हे संसद पाकिस्तानच्या नागरिकांसाठी नाही.

जर आपलं सरकार इतकं मजबूत सरकार आहे तर पाकिस्तानला संपवून टाका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. पाकिस्तान असो किंवा हिंदुस्तानचे जे बांधव तिथे आल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहे तर आपला देश आपले पंतप्रधान आणि आपले मजबूत गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आमची आशा आहे. तुम्ही कलम ३७० रद्द केलं, आम्ही त्याचं मनापासून समर्थन केलं आणि त्यावर समर्थन देत राहणार. त्यामुळे आता पाकिस्तानलाही संपवून दाखवा.

मी आज वृत्तपत्रात वाचलं की काश्मीरमध्ये दोन मुस्लीम धर्माचे जवान शहीद झाले. त्यांच्या परिवाराने देखील या विधेयकाला विरोध केला आहे. तर ते देशद्रोही तर नाहीत. मी म्हणतो हे विधेयक धार्मिक नाही, त्यामुळे या विधेयकावर मानवतेच्या आधारावर चर्चा व्हायला हवी. त्याचबरोबर घुसखोर आणि शरणार्थी यांच्यात फरक आहे, ते आम्हाला ठाऊक आहे.