मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला, यासाठी जागा वाटपात घालवलेला वेळ कारणीभूत आहे. नाना पटोले आणि संजय राऊत जागा वाटपात प्रमुख होते. आघाडीच्या जागा वाटपात वेळ घालवणे हे षडयंत्र होते का? अशी शंका काँग्रेसचे नेते, विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केली होती. यानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचा समाचार घेत जागावाटपात कसा घोळ घातला, याचे उदाहरण दिले आहे.
काही लोकांना वाटत होते, आम्ही जिंकू. राज्याचं मुख्यमंत्रिपद पाहिजे, असा खोचक टोला राऊतांनी काँग्रेसला लगावला आहे. तसेच, राष्ट्रवादीला एक जागा देण्यासाठी काँग्रेसनं 17 दिवस घोळ घातला, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : “बायकोचे तोंड कितीवेळ बघणार? रविवारीही काम करा, आठवड्यात…”, L&T च्या ‘CEO’ची मुक्ताफळे
संजय राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीमध्ये जागावाटप लांबलं गेले. त्याची गरज नव्हती. कुणामुळे हे जागावाटप गेले, हे विजय वडेट्टीवार यांना माहिती असावे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटप संपलेले नव्हते, हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीत जागावाटप इतक्या विलंबानं झाल्यावर अस्वस्थता पसरते, कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही. महायुतीत दोन महिन्यांपूर्वीच जागावाटप संपलेले होते. विजय वडेट्टीवार यांची वेदना आहे, तीच महाविकास आघाडीची आहे. चूका झाल्या आहेत, त्या स्वीकारल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी चुकीचं जागावाटप झाले.”
“काँग्रेस आणि आमच्यात नक्कीच जागावाटपावरून वाद सुरू होता. काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या. मात्र, सगळ्यात कमी जागा काँग्रेसच्या जिंकून आल्या. जागावाटपात वडेट्टीवार सुद्धा होते. विदर्भातील पराभूत झालेल्या जागा काँग्रेसनं शिवसेना आणि राष्ट्रवादीला द्यायला हव्या होत्या. किशोर जोरगेवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यास तयार होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शरद पवार आणि अनिल देशमुख हे वारंवार काँग्रेसला समजावत होते. किशोर जोरगेवारांना ती जागा सोडा. पण, त्या जागेवर काँग्रेसनं 17 घोळ घातला. ती जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही. जोरगेवार भाजपात गेले आणि जिंकून आले,” असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसनं कसा घोळ घातला याचे उदाहरण दिले.
“काही लोकांना वाटत होते, ‘आता आम्हीच जिंकू. आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. देशातील वातावरण बदललं आहे.’ पण, आपण काळजीपूर्वक लढलं पाहिजे. समोर आव्हान मोठे आहे. लोकसभेचा आपला विजय वेगळा आहे. लोकसभेतील पराभवानंतर सत्ताधारी पक्ष सावध झाला आहे. त्यामुळे आमचं तुमचं न करता एकत्रित जागा लढू, असं सांगत होतो. याला सगळे जबाबदार आहेत,” असंही राऊत यांनी म्हटलं.
“शिवसेनेनं सहा वेळा जिंकलेली कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही मागत होतो. ती जागा आमच्याकडे आली असती, तर आम्ही नक्की जिंकलो असतो. त्यासंदर्भात काहीवेळा चर्चा होऊ शकली नाही. प्रत्येकाला आपल्या-आपल्या जागा हव्या होत्या. कोणालातरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रिपद हवे होते. काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं मनावा तसा हस्तक्षेप केला नाही. जो करायला पाहिजे होता. महाविकास आघाडीच्या हातून महाराष्ट्रासारखे राज्य जाणे ही दुर्घटना आहे,” अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : 14 कोटी गुंतवणाऱ्या भाजी विक्रेत्यामुळे झाला टोरेसचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?