घरताज्या घडामोडीनाराज भास्कर जाधवांना संजय राऊतांच्या कानपिचक्या!

नाराज भास्कर जाधवांना संजय राऊतांच्या कानपिचक्या!

Subscribe

मंत्रिपद न मिळाल्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या भास्कर जाधवांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कानपिचक्या दिल्या आहेत.

महाविकासआघाडीच्या ३६ मंत्र्यांसह झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सुरू झालेलं तिन्ही पक्षांमधलं नाराजीनाट्य अद्याप संपू शकलेलं नाही. तिन्ही पक्षांमध्ये अनेक नेते नाराज असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवलेली आहे. विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आमदारांमध्ये नाराजी असून राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले आणि कोकणातून आमदार म्हणून निवडून आलेले भास्कर जाधव यांनी, ‘मंत्रिपद मिळेल असं वाटलं होतं, न मिळाल्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं आहे. उद्धव ठाकरेंनी मला शब्द दिला होता. पण का मिळालं नाही, याचं कारण मी मुख्यमंत्र्यांना विचारेन’, अशा शब्दांत आपली नाराजी बोलून दाखवली होती. आता त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भास्कर जाधवांना कानपिचक्या दिल्या आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी भूमिका मांडली.

काय म्हणाले संजय राऊत?

भास्कर जाधवांच्या उघड नाराजीवर संजय राऊतांनी त्यांना खोचक शब्दांमध्ये सुनावलं आहे. ‘उद्धव ठाकरेंनी कुणाला शब्द दिला असेल, तर तो ते पाळणारच. त्यामुळे कुणी म्हणत असेल, की उद्धव ठाकरेंनी शब्द देऊन पाळला नाही, तर त्यावर माझा विश्वास नाही. भास्कर जाधव ज्या पक्षातून आमच्याकडे आले, तिथे त्यांना निवडून येण्याची खात्री नव्हती आणि तेव्हा भाजप-शिवसेना महायुती भरात होती, त्यामुळेच ते आमच्याकडे आले. त्यांनी अनेक मित्रपक्षांमध्ये काम केलं आहे. ते कोकणातले महत्त्वाचे नेते आहेत. तसेच, तानाजी सावंत हे देखील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा मानसन्मान नक्कीच राखला जाईल. उद्धव ठाकरे स्वत: त्यांच्याशी चर्चा करतील, असा मला विश्वास आहे’, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘शिवसेना नेते नाराज हे सत्य आहे’

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना नेते मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज आहेत हे खरं असल्याचं सांगितलं. ‘शिवसैनिकांना संधी मिळाली नाही हे सत्य आहे. पण शिवसेनेच्या वाट्याला १५ मंत्रिपदं आली आहेत. सरकार स्थापन करताना काही लहान पक्षांचा आपण पाठिंबा घेतला. त्यामुळे त्यांना शिवसेनेने सत्तेतला वाटा दिला आहे. सरकारमधला मोठा भाऊ म्हणून शिवसेनेने हे केलं. उद्धव ठाकरेंनी बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकर, शंकरराव गडाख यांना शब्द दिला होता. त्यांना सत्तेत सामावून घेतलं आहे. त्यावरून शिवसेनेतल्या काहींना वाटत असेल, की त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे, तर मला तसं वाटत नाही’, असं ते म्हणाले. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत हे देखील मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.

खडसेंच्या भेटींमध्ये राजकीय चर्चा!

एकनाथ खडसेंच्या देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याविषयीच्या नाराजीविषयी देखील संजय राऊतांनी यावेळी भूमिका मांडली. ‘एकनाथ खडसेंचा मुद्दा हा भाजपचा अंतर्गत मुद्दा आहे. पण खडसेंनी उद्धव ठाकरेंची जशी भेट घेतली, तशीच शरद पवारांची देखील घेतली आहे. त्या भेटींचं कारण वेगळं असल्याचं त्यांनी सांगितलं. पण, जेव्हा दोन नेते भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा होतेच. त्यामुळे निर्णय काय झाला आहे, याविषयी ते नेतेच सांगू शकतात’, असं सूचक विधान देखील राऊत यांनी यावेळी केलं.


हेही वाचा – पहिल्यांदाच खडसेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -