संजय राऊतांविरोधात गुलाबराव पाटील समर्थक आक्रमक, पुतळा जाळत घोषणाबाजी

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही राऊत यांनी शरसंधान साधले. त्याचे तीव्र पडसाद जळगावात उमटले आहेत.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय वणवा पेटला असून शिवसैनिक आक्रमक झाले आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांकडूनही एकनाथ शिंदे गटाला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही शिंदेगटाविरोधात मोर्चा उघडला असून बंडखोर आमदारांचा ते रोज आक्षेपार्ह वक्तव्यांनी समाचार घेत आहेत. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही राऊत यांनी शरसंधान साधले. त्याचे तीव्र पडसाद जळगावात उमटले असून पाटील यांच्या समर्थकांनी राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी केली.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. शिवसेनेचे बडे नेतेही यात उतरले असून मुंबई व महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सभा घेऊन बंडखोर नेत्यांची कानउघडणी करण्याचा सपाटाच या नेत्यांनी लावला आहे. रविवारी दहिसर येथे संजय राऊत यांनी सभा घेतली . यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांचा इतिहासाच जनतेसमोर मांडला. त्यात कोण आधी काय करत होते यावर ते बोलले. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील पानटपरी चालवायचा. आता त्याला परत पानटपरी चालवावी लागेल असे सांगितले. पाटील यांच्यावरील वक्तव्यावरून पाटील समर्थक चिडले असून संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करत संजय राऊत मुर्दाबाद, गुलाबभाऊ तुम आगे बढो हम तुम्‍हारे साथ है..अशा घोषणा  करण्यात आल्या.