मुंबई : ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात येत असतो. आज (ता. 19 ऑगस्ट) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कालच्या (ता. 18 ऑगस्ट) सामनामधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणतीही टीका केली नसल्याचे स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस हे संस्कारी गृहस्थ आहेत. ते आमचे जुने सहकारी आहेत. परंतु त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी 2019 मध्ये केलेल्या बेइमानीमुळे त्यांची आज ही अवस्था झाली असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (Sanjay Raut targeted BJP over the issue of alliance)
हेही वाचा – सप्टेंबरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी बेइमान नेमके कोण? आम्ही की तुम्ही असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी युतीच्या मुद्द्यावरून देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2014 आणि 2019 मधील शिवसेना-भाजप युती का तुटली याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे जुन्या भाजपचे नेते आहेत. ज्या भाजपचा उल्लेख नितीन गडकरी यांनी केला आहे. आम्ही फक्त त्यांना आरसा दाखवला आहे. फडणवीस म्हणाले की, आमच्याशी बेइमानी केली म्हणून आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्याला आम्ही आरसा दाखवला. त्यांना आम्ही सांगितले की बेइमानी केली नाही तर तुमच्या वरिष्ठांनी बेइमानी केली. आज तुम्ही जो ड्युप्लिकेट माल घेऊन बसला आहात ती बेइमानी आहे. 2014 आणि 2019 तुम्ही बेइमानी केली म्हणून तुमच्यावर ही वेळ आली की या बनावट लोकांना सोबत घ्यायची.
2014 ला युती कोणी तोडली? यावर एकनाथ खडसे यांनी खुलासा केला आहे. आता 2019 मध्ये युती कोणी तोडली हे आम्ही सांगितले आहे. आम्ही भाजपला आरसा दाखवला आहे. आम्ही असे कुठे म्हणालो की हा देवेंद्र फडणवीस यांचा अपराध आहे म्हणून? तुमचे वरिष्ठ शब्दाला जागले नाहीत. त्यांनी शब्द राखला नाही. युती तोडली म्हणून ही वेळ आली आणि नितीन गडकरी यांनी नेमकं हेच भाष्य केले आहे, असे राऊतांनी सांगितले.
तर, 2014 मध्ये आम्ही युती तोडली नाही. भाजपच्या घमंडामुळे ती युती तुटली. एका जागेसाठी तुम्ही शिवसेनेसोबतची 25 वर्षांची युती तोडली आणि 2019 मध्ये अमित शहांसमोर बोलणे झाले होते की 50-50 फॉर्म्युला करणार म्हणून. पण जेव्हा आम्ही एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी दिले त्यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून चालणार नाही असे सांगत त्यांनीच युती तोडली, असे सांगत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.