Homeमहाराष्ट्रSanjay Raut : शहांवर टीका केल्याने शिंदेंना धडपडण्याची गरज नाही, राऊतांचा टोला

Sanjay Raut : शहांवर टीका केल्याने शिंदेंना धडपडण्याची गरज नाही, राऊतांचा टोला

Subscribe

भाजपा नेते अमित शहा यांच्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जहरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले. पण त्यांच्या या प्रत्युत्तरावर आता खासदार राऊतांनी निशाणा साधला आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारीला घेतलेल्या मेळाव्यातून केंद्रीय मंत्री, भाजपा नेते अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली. आमच्या नादाला लागू नका, असे आव्हानच ठाकरेंनी शहांना दिले आहे. त्यामुळे भाजपाचे नेते उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक झाले आहेत. पण अमित शहांवर टीका केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून शहांच्या येण्याने काही लोकांच्या पोटात दुखू लागते, असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर पलटवार केला. पण शिंदेंच्या या पलटवाराला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शहांवर टीका केल्याने शिंदेंना धडपडण्याची किंवा उत्तर देण्याची गरज नाही, असे राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्या आले आहे. (Sanjay Raut targeted Eknath Shinde reply to Uddhav Thackeray for criticizing Amit Shah)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज शनिवारी (ता. 25 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत म्हणाले की, अमित शहा हे भाजपाचे नेते आहेत. जे महाराष्ट्रात लुटत आहे, त्या भाजपाच्या नेत्यांवर टीका केली म्हणून एकनाथ शिंदे जे स्वतःला शिवसेनेचे नेते समजतात, त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. याबाबत अमित शहा आणि त्यांचा पक्ष पाहिल. कारण त्यांच्या पक्षाला प्रवक्ते आहेत. त्यांचा पक्ष अमित शहांवरील हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. अमित शहांवर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेंना धडपडायची गरज नाही, असा टोला यावेळी राऊतांनी लगावला.

हेही वाचा… Thackeray vs Mahayuti : हेच राज्यकर्त्यांचे दाखवायचे दात, उद्धव ठाकरे यांची टीका

तर उद्धव ठाकरेंनी अमित शहा हे किस झाड की पत्ती आहे, असे म्हटले होते. त्यावर प्रत्युत्तर देत उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अमित शहा हे असे वृक्ष आहेत, ते असा जमालगोटा आहेत, जे भल्याभल्यांना त्रासदायक ठरतील. शिंदेंच्या या टीकेवर उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, अमित शहा हा जमालगोटा नक्की कोणाला देणार, ते पाहू. एक दिवस हा जमालगोटा एकनाथ शिंदेंना सुद्धा मिळणार आहे. मी जे सांगत आहे की महाराष्ट्राला तिसरा मुख्यमंत्री मिळणार, ते शिंदेंना सुद्धा माहीत आहे. महाराष्ट्राला जो तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, तो शिंदेंच्याच पक्षातील असणार, असा दावा यावेळी राऊतांनी केला. तसेच, या जमालगोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका, असे म्हणत राऊत म्हणाले की, अमित शहांनी ईडीचा जमालगोटा दिल्याने शिंदे आणि इतर सर्व पक्षातून फुटले, असा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला.

तसेच, जमालगोटा काय असतो? उद्या ईडी आणि सीबीआय आमच्याकडे दोन तासासाठी आले तर आम्ही त्यांना जमालगोटा देऊ आणि 72 तास संडासात बसवू. हे जमालगोटे त्यांनी आम्हाला सांगू नये, कारण या ईडी आणि सीबीआयच्या गोळ्या आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना सुद्धा ही गोळी देण्यात आल्याने अमित शहांच्या बाजूने त्यांची ही पोपटपंची सुरू आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर, स्वाभीमानावर आक्रमण केले आहे. ते महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. अमित शहांनी मराठी माणसाच्या स्वाभीमानावर पाय ठेवला आहे. अशावेळी उद्धव ठाकरे बोलले असतील तर एकनाथ शिंदेंनी त्याचे कौतुक केले पाहिजे, पण हे लाचार आहेत. एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून अमित शहा जो जमालगोटा देतात, त्याच्यामुळे ते तोंडाने उलट्या करत आहेत, असा हल्लाबोल यावेळी राऊतांनी केला.