मनसेनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी घेतले श्रीरामाचे दर्शन, आदित्य ठाकरेंच्या आगमनासाठी जय्यत तयारीला सुरूवात

sanjay raut

मनसेनंतर (MNS ) शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी आज अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, अनिल तिवारी आणि जीवन कामत या नेत्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी दोन बडे नेते अयोध्येत आले आहेत. दरम्यान, संजय राऊतांनी ट्विट करत आम्ही श्रीरामाचे दर्शन घेतले असून आदित्य ठाकरेंच्या आगमनासाठी जय्यात तयारी सुरू असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे.

संजय राऊतांचं ट्विट –

आज अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.अत्यंत सकारात्मक ऊर्जा असलेले हे तीर्थस्थान आहे.माझ्यासोबत श्री. एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई,सूरज चव्हाण,अनिल तिवारी,जीवन कामत होते. १५ तारखेस अयोध्येत अदित्य ठाकरे यांचे आगमन होत.त्या सोहोळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. जय श्रीराम!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

ही श्रद्धेची भावना आहे, आम्ही व्यक्त करू

१५ तारखेला आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे. त्याची तयारी करण्यासाठी आम्ही येथे आलो आहे. आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येताहेत त्यामुळे येथील लोकांमध्ये उत्साह आहे. १५ तारखेला लखनऊपासून ते अयोध्येपर्यंत तुम्हाला त्यांचं स्वागत होताना दिसेल. शक्तीप्रदर्शन नाही. ही श्रद्धेची भावना आहे, ते आम्ही व्यक्त करू, असं संजय राऊत म्हणाले.

खासदार बृजभूषण सिंह यांच्यावरही दिली प्रतिक्रिया

संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बृजभूषण सिंह मोठे नेते आहेत. आम्ही त्यांनी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते आमचे मित्र आहेत. परंतु त्यांची जी चळवळ सुरू आहे. त्यामध्ये त्यांची भावना आहे. उत्तर प्रदेशच्या लोकांच्या भावनेला त्यांनी आवाज दिला आहे. उत्तर प्रदेशातील लोकांच्या भावनेचा उद्रेक त्यांनी मांडला. ठिक आहे. पण आमचा त्यांच्या चळवळीशी काहीच संबंध नाही, असं राऊत म्हणाले.

राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत असली-नकलीचे पोस्टर लागले होते. त्यावरही राऊत म्हणाले की, असली येत आहेत. नकलीचं माहीत नाही. आता असली नकलीचा निर्णय राज्य आणि देशातील जनता नेहमी करते, असं म्हणत राज ठाकरेंना राऊतांनी टोला लगावला आहे.

दरम्यान, ठाणे-पालघर जिल्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (रविवार) अयोध्येत भेट दिली होती. तसेच त्यांनी श्रीरामचे दर्शन घेतले होते. आम्हाला कोणीही अडवू शकत नाही, असा थेट इशारा अविनाश जाधव यांनी अयोध्येतूनच विरोधकांना दिला होता.


हेही वाचा : काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून पुन्हा एकदा संजय राऊतांचा भाजपावर निशाणा