नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पण निवडणूक निकालाच्या चार दिवसांनंतरही महायुतीतील मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटू शकलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपाने त्यांना 2024 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्याचा कोणताही शब्द दिला नव्हता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी भाजपाकडून देण्यात येणाऱ्या वचनांचा आणि शब्दांचा समाचार घेतला आहे. भाजपाची भूमिका ही गरज सरो, वैद्य मरोसारखी असल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे. (Sanjay Raut venomous criticism on BJP role)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता. 27 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यात अद्यापही महायुतीची सत्ता स्थापन न झाल्याबाबत विचारणा करण्यात आली. त्याबाबत राऊत म्हणाले की, जेव्हा आम्ही आशादायी होतो, तेव्हा सरकार उशीर बसवले तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल असे सांगण्यात येत होते. मात्र आता 26 तारीख उलटून गेली आहे. विधानसभेची मुदत संपली आहे. तीन पक्षाच्या युतीला सैतानी बहुमत मिळाले आहे. त्यामध्ये भाजपाला साधारण 140 जागा आहेत, त्यांचे इतर मित्र पक्ष मिळून पण तरी सुद्धा राज्याला मुख्यमंत्री मिळाला नसेल तर यांचे तंगड्यात तंगडे अडकले आहे आणि हे एकमेकांच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम पडद्याच्या मागे सुरू आहे, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
हेही वाचा… Maharashtra Election 2024 : ईव्हीएम है तो मुमकीन है, विधानसभा निकालावरून ठाकरे गटाचा घणाघात
तसेच, लोकांनी बहुमत कशाकरिता दिले? असा प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले की, भाजपाचे दिल्लीत शूरवीर नेतृत्व आहे. त्यांनी डोळे वटारले की सर्व जण शांत बसतात, असा आतापर्यंतचा अनुभव होता. पण त्यांनी जे बंडखोर, भूत निर्माण केली आहेत ती त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना घाबरत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आव्हानाची भाषा देऊन ते मोदी आणि शहांनाच आव्हान करत आहेत, असे चित्र दिसत आहे. आता महाराष्ट्रात सरकार कधी येईल, त्यांचा मुख्यमंत्री कधी बसेल? याबाबत राज्यातील जनतेत संभ्रम आहे. आम्ही अपेक्षा करतो की महाराष्ट्राला लवकर एक मुख्यमंत्री मिळेल, लवकरच सरकार मिळेल आणि कारभार सुरू होईल, असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.
तर, भाजपाचा जो शब्द असतो तो गांभीर्याने घ्यायचा नसतो. भाजपाची भूमिका ही गरज सरो वैद्य मरो म्हणजेच वापरा आणि फेकासारखी असते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दांनंतर आणि शब्द फिरवल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण कसे बदलले हे आपण पाहिले असेल. भाजपाने फिरवलेल्या शब्दाची सर्वात मोठे बळी ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना बनली आहे. भाजपा कधीच शब्द पाळत नाही. मग तो शब्द खुलेआम दिलेला असो किंवा बंददाराआड दिलेला असो. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेला शब्द असो किंवा पंतप्रधानांच्या खोलीत दिलेला शब्द असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला शब्द असो. असे कोणतेही शब्द पाळणे हे भाजपावर कधी बंधनकारक नसते आणि ती नैतिकता ते पाळत नाही किंवा पाळत आलेले नाही. त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी किंवा सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते, तेव्हा ते आश्वासन आणि वचनांचा पाऊस पाडतात. यानंतर त्यांचे काम भागले की ते लाथा घालतात. आता हे आपल्याला महाराष्ट्रात दिसत आहे. पण भाजपा आणि शिवसेना एकत्र होती, तेव्हाही हा अनुभव घेतलेला आहे, असा आरोपच राऊतांकडून भाजपावर करण्यात आला आहे.