घरमहाराष्ट्रसंजय राऊतांना ईडीचे नवे समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहावे लागणार

संजय राऊतांना ईडीचे नवे समन्स, ‘या’ तारखेला उपस्थित राहावे लागणार

Subscribe

पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणावर शिवसेनेने भाजपचे हे सुडाचे राजकारण असल्याचे म्हटले होते

मुंबईः शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहणार नाहीत. संसदेचे अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे त्यांनी सध्या ईडीसमोर वेळ मागितली आहे. संजय राऊत यांनी 7 ऑगस्ट नंतरची तारीख देण्यात यावी, अशी मागणी ईडी अधिकाऱ्यांकडे केली आहे. 7 ऑगस्टनंतरची तारीख देण्याऐवजी त्यांना याच महिन्यातील 27 जुलैची तारीख देत चौकशीसाठी बोलाविले आहे. याआधीही संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावून त्यांचा जबाब नोंदवला होता.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची 1 जुलैला सुमारे 10 तास चौकशी करण्यात आली होती. हे प्रकरण मुंबईतील पत्रा चाळ नावाच्या गृहसंकुलाच्या पुनर्विकासातील कथित घोटाळ्याशी संबंधित आहे. एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणासंदर्भात संजय राऊत यांच्या कौटुंबिक मालमत्ता जप्त केल्या होत्या. संजय राऊतांनी बुधवारी वकिलांमार्फत संपर्क साधून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी 7 ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता, पण ती मागणी फेटाळत ईडीनं बुधवारी संजय राऊतांना नवे समन्स बजावले आहे. तसेच संजय राऊतांना 27 जुलैला ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितलेय.

- Advertisement -

राऊतांनी आपल्याविरोधात षडयंत्र असल्याचं सांगितलं

संजय राऊत यांनी याला षडयंत्र म्हटले असले तरी तपासात सहकार्य करणार असल्याचे ठणकावून सांगितले. 1 जुलैला 10 तास झालेल्या चौकशीनंतर ते म्हणाले की, “एजन्सीचे काम तपास करणे आहे. आमचे काम त्यांच्या तपासात सहकार्य करणे आहे. त्यांनी मला बोलावले होते म्हणून मी आलो आणि मी ईडीला सहकार्य करीत राहीन.” संजय राऊत म्हणाले होते, “ईडी, सीबीआय किंवा आयकर विभागाचे महत्त्व कमी होत चालले आहे. यापूर्वी जेव्हा ही एजन्सी कोणतीही कारवाई करत असे तेव्हा असे वाटायचे की काहीतरी गंभीर घडत आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून असे दिसते की यंत्रणांकडून कारवाई केली जाते. एक राजकीय पक्ष आपला राग काढत आहे.”

भाजपवर सुडाचे राजकारण केल्याचा आरोप

एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी नुकतीच केलेली बंडखोरी केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीपोटी केली होती, असेही शिवसेना खासदार म्हणाले होते. एकदा तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारला ‘ईडी सरकार’ असंही म्हटलं होतं. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणावर शिवसेनेने भाजपचे हे सुडाचे राजकारण असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

काय आहे पत्रा चाळ घोटाळा?

पत्रा चाळ ही मुंबईतील गोरेगाव येथे आहे. महाराष्ट्र सरकारने चाळींमध्ये राहणाऱ्या ६७२ भाडेकरूंना सदनिका देण्याची सरकारी योजना तयार केली, तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ज्यासाठी एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने भाडेकरूंसाठी सदनिका बांधण्याचे कंत्राट दिले होते. कंपनी चाळीतील भाडेकरूंना ६७२ सदनिका देऊन ३००० सदनिका महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) देणार होती.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने चाळीत राहणाऱ्या लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणालाही सदनिका दिल्या नाहीत, असा आरोप आहे. हा कथित जमीन घोटाळा (पत्र चाळ घोटाळा) 1,034 कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले येते. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊतला या प्रकरणी ईडीने अटक केली होती.


हेही वाचाः द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, कोण होणार भारताचे नवे राष्ट्रपती? आज निकाल होईल जाहीर

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -