श्रीकांत शिंदेंनी राजा ठाकूरला माझी सुपारी दिली, संजय राऊतांचा आरोप

मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्यावर हल्ला करण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला सुपारी दिली असून तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला असून त्यांनी याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. राऊतांनी हे पत्र ट्वीटसुद्धा केले आहे. ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. या पत्राची प्रत त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनाही पाठवली आहे.

हेही वाचा शिंदे गटातील ‘त्या’ मंत्र्याच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांना धमकीचे २ फोन?

संजय राऊत पत्रामध्ये म्हणतात की, “महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटविण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्यालाल कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे.”


महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरू झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट सातत्याने आमनेसामने येत आहेत. निवडणूक आयोगाने  शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. त्यातच, विधिमंडळ आणि संसदेतील कार्यालय शिंदे गटाकडे गेल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच, संजय राऊत यांचा जीव धोक्यात असल्याचंही त्यांनी आज ट्वीटद्वारे सांगितलं आहे. संजय राऊत यांना मारण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरण चिघळल्यानंतरही संजय राऊत यांना धमकीचे फोन आले होते, अशी माहिती समोर आली होती. शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर संजय राऊतांना धमकीचे दोनवेळा फोन आले. या धमकीनंतर संजय राऊत यांनी “माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल”, असं म्हटले  होतं.

संजय राऊतांना सातत्याने धमकीचे फोन येत असतात. त्यामुळे त्यांनी आज पोलिसांना पत्र लिहिले आहे. पोलीस या पत्राची दखल घेऊन योग्य कार्यवाही करतात हे पाहावं लागेल. तसंच, यामध्ये गुंड राजा ठाकरू, खासदार श्रीकांत शिंदे यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस त्यादृष्टीने तपास करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.