गुंडांना जामिनावर सोडवून त्यांना टास्क दिला जातोय, संजय राऊतांचा पुन्हा मोठा आरोप

the police act as political agents and distribute money; Sanjay Raut's allegation
संग्रहित छायाचित्र

मुंबई – मला मारण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली आहे, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाण्याचे पोलीस आयुक्त जगजित सिंग यांना पत्र लिहिले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनाही हे पत्र पाठवलं आहे. यावरून त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर आगपाखड केली आहे. ठाण्यातील गुंडांना जामिनावर सोडवून त्यांना टास्क दिला जातोय, असा मोठा आरोप त्यांनी केला आहे. तसंच, मला सुरक्षा नकोय. मी लाचार नाही. मी एकटा वाघ आहे, असं म्हणत तुम्ही विरोधकांना अशाप्रकारे संपवणार आहात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आज त्यांनी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर आगपाखड केली.

हेही वाचा – श्रीकांत शिंदेंनी राजा ठाकूरला माझी सुपारी दिली, संजय राऊतांचा आरोप

माझ्यावर लवकरच हल्ला करण्याचा प्रयत्न होईल. खासदार श्रीकांत शिंदे सध्या सत्तेची सर्व सूत्र ते हलवतात असं मला समजलं आहे. ठाण्यातील जामीनावर सुटलेले राजा ठाकूर यांना सुपारी दिली आहे. ही विश्वसनीय माहिती आहे. अशोक चव्हाण, प्रज्ञा सातव यांनाही धमक्या आल्याचं त्यांनी सांगितलं.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच आमच्या सुरक्षा काढून घेण्यात आल्या. तरीही आमची तक्रार नाही. पण तुमचं काय चाललंय, सत्तेवर असलेल्या एका गटाचे खासदार आमदार ज्या पद्धतीने धमक्याची भाषा वापरत आहेत, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गुंडांना जामिनावर तुरुंगातून सोडवलं जातं. त्यांना टास्क दिलाय जातोय. याबाबतच्या काही गोष्टी लवकरच उघड होतील, असंही राऊत म्हणाले.

मी सुरक्षा मागितलेली नाही. तुम्ही सुरक्षा काढलेली आहे. राज्य सुरक्षित आहे. ज्यांना फोडलं जातं त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाते. आमच्यातीलही काही लोकांना सुरक्षा दिलेली नाही. मी कुठेही सुरक्षेची मागणी केलेली नाही. आम्ही लाचार नाही. सुरक्षा पाहिजे म्हणून पत्र लिहिलेलं नाही. सुरक्षा नाही दिली चालेल. मी एकटा वाघ आहे. असे खूप वार अंगावर झेलले आहेत. राज्यात काय चाललंय. तुमचे आमदार खासदार काय करतातय. विरोधकांना तुम्ही अशाप्रकारे संपवणार आहात का. तुम्ही शशिकांत वारिशेलाही अशाप्रकारे मारलंत. हे जे अजिर्ण झालंय ते ढेकर देत बसा, असंही राऊत उद्विग्नपणे म्हणाले.