कोणीही असो शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचे स्पष्ट वक्तव्य

sanjay Raut's clear statement on Sambhaji Raje candidature for rajyasabha
कोणीही असो शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचे स्पष्ट वक्तव्य

शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नाकारली आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यावर आम्ही शिवसेनेचा उमेदवार जाहीर करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याचे राऊत म्हणाले होते. संभाजीराजेंना विरोध नाही परंतु आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही असे स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार असल्याचे राऊतांनी सांगितले आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणाकडे संभाजीराजेंनी पाठ फिरवली आहे. संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेना दोन जागा लढवणार आहे. दोन जागा लढवणं हा राजकीय अपराध नाही. शिवसेना राजकीय पक्ष आहे. मराठी माणुस आणि हिंदुत्वाचे फार मोठी संघटना आहे. शिवसेना राजकारणात अनेक वर्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. अशा वेळेला जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका ६ जागांसाठी होत आहेत. त्यातील २ जागा शिवसेना लढत आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आम्ही देऊ आणि निवडून आणू अशी शिवसनेची भूमिका असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही

कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. एखादा उमेदवार मी लढणार असो जाहीर करतो तेव्हा त्यांच्याकडे निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केली असावी. त्यांनी विजयी होण्यासाठी ४२ मतांची व्यवस्था केली असावी. त्यांना कोणीतरी पाठिंबा देत असेल अशा वेळी त्यांच्यात पडण्याची गरज नाही. ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. पंरतु असे कळतं आहे की, त्यांच्याकडे मत नाहीत. आता आम्ही कसे मत देणार, आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे. अपक्ष नाही. आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही मग ते कोणीही असो, शिवसेनेचा उमेदवारच राहील. आम्ही संभाजीराजेंना सांगितले शिवसेनेत या आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा, राज्यसभेत एक शिवसेनेचा खासदार वाढवणं गरजेचे आहे. तुम्ही थोडं एक पाऊल पुढे या आम्ही दोन पाऊलं मागे जाऊ परंतु निर्णय त्यांचा आहे.

पण कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन उमेदवार शिवसेनेचे राज्यसभेवर जातील आणि ते पक्के शिवसैनिक असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने मी सांगतो आहे. आम्ही शिवसेनेचे दोन खासदार निवडून आणू अशी आमची भूमिका आहे. त्यांना आमचा विरोध नाही. जागा आमच्या आहेत. उलट आम्ही पुढे जात आहोत असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Rajya Sabha Election 2022 : शिवसेना पक्ष प्रवेशाकडे संभाजीराजेंची पाठ, कोल्हापूरच्या दिशेने रवाना