मुंबई : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी सत्ताधाऱ्यांकडून घातपात घडवण्याचा हेतू असल्याची भीती देशभरातील प्रमुख राजकीय पक्षांना वाटत असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी, एटीएसला पत्र लिहून खासदार संजय राऊत यांची देशविरोधक संघटनेशी जवळीक असल्याचा आपल्याला विश्वास असल्याचे म्हटले आहे.
Gaddar ! pic.twitter.com/SJR2fbVrL0
— nitesh rane (@NiteshNRane) August 30, 2023
देशभरात 2024च्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. ठाकरे गटाकडून भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर सातत्याने टीका केली जात आहे. त्याच अनुषंगाने खासदार संजय राऊत यांनी कालच, मंगळवारी भाजपावर संशय व्यक्त केला. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या वेळेला देशभरातून ट्रेन अयोध्येला बोलावून एखाददुसऱ्या ट्रेनवर पुलवामाप्रमाणे हल्ला घडवून देशामध्ये जात-धर्माच्या नावाखाली आगडोंब उसळणार नाही ना? अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. कारण निवडणुका जिंकण्यासाठी हे काहीही करू शकतात, अशी भीती या देशातील अनेक प्रमुख राजकीय पक्षांना वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – नीती आयोगाच्या हाती मुंबईची सूत्र, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका
यासंदर्भात भाजपा आमदार नितेश राणे यांनी दहशतवादविरोधी पथकाचे (ATS) प्रमुख सदानंद दाते यांना पत्र लिहिले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे. अशावेळेस वारंवार सामाजिक सलोखा भंग करण्याचे प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्ती करत आहेत. त्यात सर्वात अग्रक्रमावर राज्यसभेचे खासदार संजय राऊत असून ते मे 2022पासून महाराष्ट्रात दंगली घडवल्या जातील, अशा बातम्या वारंवार जाणीवपूर्वक माध्यमांतून पसरवित आहेत, असा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे.
संजय राऊत यांच्या या पूर्वीच्या विधानानंतरच संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी अचानक काही लोकांनी औरंगजेबाचे फोटो स्टेटस म्हणूनही ठेवले आहेत, त्यामुळे विविध भागात दंगलीसुद्धा घडलेल्या आहेत. काल, सोमवारी त्यांनी माध्यमांपुढे पुन्हा जाणीवपूर्वक विधान केले की, ‘श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्यावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून रेल्वेने लोकांना बोलावले जाईल. यातील एखाद-दुसऱ्या रेल्वेवर दगडफेक केली जाईल.’ त्यांचे हे विधान मला चिंतेत टाकणारे वाटत आहे. मला खात्री आहे की देशविरोधक संघटनेशी त्यांची जवळीक असावी आणि भारत देशाविरूद्ध संभाव्य कटकारस्थान रचल्या जाणाऱ्या षडयंत्रांचा भाग असावेत म्हणूनच त्यांना संभाव्य दंगलीची एवढी सखोल माहिती आहे, हे नाकारता येत नाही, असा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
हेही वाचा – …तरी मोदी-शहांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे, ठाकरे गटाला विश्वास
पाकिस्तानची तारीफ करणाऱ्या प्रवृत्तींना संजय राऊत आपला आजमितीस सातत्याने आदर्श मानत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विनाविलंब कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांच्याकडे असलेली संभाव्य दंगलीची अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी आवश्यकता वाटल्यास, न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांची नार्कोटेस्टही करावी, जेणेकरून दहशदवादी संघटनांचे जाळे संपूर्णतः नष्ट करून देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल, अशी विनंती त्यांनी केली आहे.