संजय राऊतांच्या अडचणी वाढणार, कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट

Sanjay Raut | न्यायालयात हजर राहू शकलो नाही याबाबत खेद आहे. हायकोर्टात एक विषय होता, तिथून येथे येण्यास ट्राफिक होतं, म्हणून पोहोचू शकलो नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

संग्रहित छायाचित्र

Sanjay Raut | मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी सुरू असलेल्या सुनवाणीत सातत्याने गैरहजर राहिल्याने कोर्टाने संजय राऊत यांना आजीमनपात्र वॉरंट जारी केलं आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टात पुढची सुनावणी आता २४ जानेवारीला होणार आहे.

किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सातत्याने गैरहजर राहिल्याने शिवडी कोर्टाने संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मेधा सोमय्या यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुढील सुनावणी २४ जानेवारीला होणार, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.


काय आहे प्रकरण?

संयज राऊत यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आणि मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील १६ शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच, साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी त्यांना अनेकवेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तेव्हा दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे हजर राहता आले नाही. त्यानंतर ते ईडीच्या कोठडीत होते. त्यामुळे सुनावणीला हजर राहू शकले नाहीत. मात्र, आताही ते हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल करण्यात आलं आहे.

ईडीच्या कोठडीतून संजय राऊत नुकतेच सुटून आले आहेत. सुटून आल्यानंतरही त्यांनी सरकारविरोधात आगपाखड सुरू ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊत पुन्हा तुरुंगात जातील, असा इशारा सत्तेमधील अनेक नेत्यांनी दिला आहे. त्याचपार्श्वभूमीवर कोर्टाने त्यांना अजामीनपत्र वॉरंट पाठवल्याने संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

न्यायालयात हजर राहू शकलो नाही याबाबत खेद आहे. हायकोर्टात एक विषय होता, तिथून येथे येण्यास ट्राफिक होतं, म्हणून पोहोचू शकलो नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.