मुंबई : राज्यातील राजकारणातील दिवाळीचे फटाके फुटायला सुरुवात झाली की काय? असा प्रश्न काल शुक्रवारी (ता. 10 नोव्हेंबर) अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीनंतर राज्यातील जनतेला पडला आहे. कालची ही घडामोड एवढ्यावरच थांबली नाही तर शरद पवारांच्या भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे हे सुद्धा उपस्थित होते. तेव्हा ही भेट राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घेऊन येते की काय? असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. या भेटीवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू असतानाच आता ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिश्किल टोला लगावला आहे. (Sanjay Raut’s tough talk on Amit Shah-Ajit Pawar meeting)
हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टमुळे उद्धव ठाकरे ठाण्यात येण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार काल (ता. 10 नोव्हेंबर) देशाच्या गृहमंत्र्यांना भेटले. हा खरा तर एक विनोद आहे. जवळच्या माणसाने मला हा विनोद सांगितला. आतापर्यंत आजारी माणासाला लोक भेटायला येत होते. तशी परंपरा आहे. मी आजारी आहे, मला डेंग्यू झाला आहे, मला अंथरूनातून उठता येत नाहीये. मला दिवाळीत कोणी त्रास देऊ नका, मी कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही. मी खूप आजारी आहे, असे सांगण्यात येत होते. पण काल प्रथमच आजारी माणूस कोणाला तरी भेटायला गेला आहे, असा मिश्किल टोला राऊतांनी लगावला.
तसेच, आपल्याला माहीत आहे की आजारी असलेल्या माणसाला सर्वजण भेटायला येत असतात. त्यांची विचारपूस करत असतात. हवा खराब आहे. डेंग्यू झाला आहे. प्लेटलेट्स कमी आहेत, अशी विचारपूस करून आपण काळजी घेत असतो. जो माणूस आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की मला दिवाळीत भेटू नका, मी आजारी आहे. तो आजारी माणूस उठतो आणि दिल्लीत कोणाला तरी भेटायला जातो. आजारी माणसाने दुसऱ्यांना भेटायला जायचे, आजारी माणसाला कोणी भेटायला यायचे नाही, ही एक नवीन परंपरा सरकारमध्ये सुरू झाली आहे, अशी खोचक टिप्पणी संजय राऊतांकडून यावेळी करण्यात आली.