काही दिवसांपूर्वी मुंब्र्यातील शिवसेना शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आली होती. त्यानतंर नवीन कंटेनर शाखा सुरू करण्यात आली. शाखेवरून शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटामध्ये पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं. त्यानंतर शनिवारी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मुंब्र्यातील वादग्रस्त ठरलेल्या शाखेला भेट दिली.
उध्दव ठाकरे यांच्या पोलिसांनी शाखेपासून काही मीटर अंतरावरच अडविले आणि माघारी पाठविले. शिंदे आणि ठाकरे गटामध्ये राजकारण तापू लागले आहे. डुप्लीकेट शिवसेनने जो माज दाखवला आहे, तो माज काल हजारो शिवसैनिकांनी उतरवला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेना ठाकरेंची आहे आणि शाखा शिवसेनेची आहे. सत्ता घटनाबाह्य मिळविली याचा अर्थ शिवसेनेच्या शाखा त्यांच्या मालकीच्या होत नाहीत. खरी शिवसेना कोणाची हे ३१ डिसेंबरनंतर दुध का दूध पाणी का पाणी होईल. असं संजय राऊत म्हणाले.
सत्तेच्या जोरावर जे फुरफुरत आहेत त्याचे काय करायचे हे आम्ही पाहू. पण यापुढे शिवसेनेच्या कोणत्याही शाखेवर आक्रमण किंवा अतिक्रमण केले तर आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ. काल एक झलक होती, ट्रेलर होता. शिवसेनेच्या शाखा बाळासाहेब ठाकरे यांच्या आहेत. शिवसेनेच्या शाखा तुमच्या बापाच्या नाहीत अशी शब्दीक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
हजारो शिवसैनिकांच्या ताकदीला फुसका बार म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपचे ते मांडलिक आहेत. भाजपच्या प्रचाराला चार राज्यात ते जाणार आहेत. चार राज्यांत प्रचाराला जाण्यापेक्षा मुंबई ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या आणि इथे प्रचार करा. ही हिम्मत दाखवा. नुसते ग्रामपंचायत दाखवली, ग्रामपंचायतचे काय राजकारण सांगत आहात अभ्यास करा, असेही राऊत यांनी शिंदेंना सुनावले.
मुंब्र्यातील शाखेचा नेमका वाद काय?
मुंब्रा इथं शिवसेनेची शाखा होती. मात्र शिवसेनतील फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गट अशा दोन गटामध्ये शिवसेना विभागली. त्यानंतर शाखा – शाखांबवर दोन्ही गटांकडून दावे केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे मुंब्र्यातील शाखेवर दोन्ही गटांनी दावा केला आणि २ नोव्हेंबरला मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिलव्याचा आरोप केला.
आधीची शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिंदे गटाने त्याच जागी कंटेनर शाखा बसवली आहे. मात्र ही शाखी तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला.
मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकराजन किणेयांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांच्या जमावाने शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला बाहेर काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केल्याचा आरोप आहे.