मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह दिले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. त्यामुळे या चिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार करून ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. यासाठी आज रायगडावर ‘तुतारी’ या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. (Sanjay Raut’s warning to the ruling party over the party symbol)
हेही वाचा… Sanjay Raut : पवार-शिंदेंचे उमेदवार निवडणूक लढणार ‘कमळ’ चिन्हावर! राऊतांचा खळबळजनक दावा
प्रसार माध्यमांसमोर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील 11 कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे. हातात मशाल घेऊन ही तुतारी वाजवण्यात येईल. ऐतिहासिक असे तुतारी चिन्ह राष्ट्रवादीला मिळाले आहे. शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे एका हातात शिवसेनेची मशाल आहे आणि दुसऱ्या हातात तुतारी आहे. जेव्हा शिवराय युद्धाला जात होते, तेव्हा ते तुतारी वाजवायचे. ज्यामुळे मावळ्यांच्या अंगात उत्साह संचारायचा. आज शरद पवार रायगडावर तुतारीचे अनावरण करणार आहेत. त्यामुळे आता आम्ही महाविकास आघाडीतील एकत्र येऊन सर्वांची तुतारी वाजवू, असा इशाराच संजय राऊत यांच्याकडून सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
हुकूमशाहीचा पराभव हीच आमची भूमिका…
लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होतील. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागा वाटप जाहीर करण्यात येईल. संपूर्ण देशामध्ये जागा वाटप अत्यंत सुरळीत कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रात होत आहे. कारण हुकूमशाहीचा आणि एकाधिकारशाहीचा पराभव करणे हे आमचे एकच ध्येय आहे. या महाराष्ट्राची परंपरा आहे की लोकशाही, धर्मनिरपेक्षता या भूमिकांचा विजय करणे. त्यामुळे या हुकूमशाहीचा पराभव करणे ही आमची भूमिका आहे, असे राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यामुळे येत्या 27 तारखेपर्यंत मविआतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यात येईल, असे राऊतांकडून पुन्हा सांगण्यात आले आहे.