शरद पवार, राहुल गांधींचा फोटो शिवसेना भवनात लागेल; संजय शिरसाटांची टीका

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर संजय शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडी या निवडणुकीसाठी रिंगणात उतरली असली तरी भाजप व शिंदे गटाने जी रणनिती आखली आहे. त्याने विजय आमचाच आहे. अनेक पराभव महाविकास आघाडीने मान्य केले आहेत. मात्र हा विजय कसा पचवावा या चिंतेत ते आहेत, असा टोला संजय शिरसाट यांनी हाणला.

Sanjay Shirsat
संजय शिरसाट

 

मुंबईः संजय राऊत हा शरद पवार व राहुल गांधींचा फोटो शिवसेना भवनात लावायला कमी करणार नाही, अशी टीका शिंदे गटाचे आमदर संजय शिरसाट यांनी सोमवारी केली. ही टीका करताना संजय शिरसाट यांनी खासदार राऊत यांचा एकेरी उल्लेख केला.

एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत नेमके काय करतोय हे त्यालाही कळत नाही. सध्याच्या घडीला संजय राऊत हा राजकारणातला जोकर आहे. तो वेडा माणूस आहे. शिवसेना प्रमुखांनी ज्यांचा विरोध केला. जे गाडलेले मुडदे आहेत. त्यांना जीवंत करण्याचे काम संजय राऊत करत आहे. त्याला हिंदुत्त्व कळायला अवकाश आहे. सर्वधर्म समभावची व्याख्या त्याला पाठ झाली असावी. शिवसेना संपली असा त्याला समज झाला असावा. म्हणूनच तो अशी विधाने करतो आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर संजय शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडी या निवडणुकीसाठी रिंगणात उतरली असली तरी भाजप व शिंदे गटाने जी रणनिती आखली आहे. त्याने विजय आमचाच आहे. अनेक पराभव महाविकास आघाडीने मान्य केले आहेत. मात्र हा विजय कसा पचवावा या चिंतेत ते आहेत, असा टोला संजय शिरसाट यांनी हाणला.

सकल हिंदू समाजाच्यावतीने मुंबईत रविवारी जन आक्रोश मोर्चा निघाला. लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली. या मोर्चात भाजपचे सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. सर्व भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मोर्चेकरी शिवसेना भवनासमोर एकवटले होते. तेथून मोर्चा पुढे सरकला. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मोर्चावर व भाजप नेत्यांवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, हा मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात होता. कारण गेली आठ वर्षे केंद्रात सत्तेत असूनही हिंदूंना न्याय मिळत नाही. काश्मिरी पंडितांचा प्रश्न सुटलेला नाही. त्याचाच आक्रोश या मोर्चातून करण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना भवनच हिंदूंना न्याय देऊ शकते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच हा मोर्चा शिवसेना भवन समोरून निघाला, असा दावा राऊत यांनी केला. याला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली.